वैभववाडीः वैभववाडी आणि फोंडा परिसरातील अनेक गावांमध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास वळवाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सर्वाचीच तारांबळ उडाली. अनेक भागात अर्धा तास सरी कोसळल्या. पावसामुळे विवाह आणि इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला. पावसानंतर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण दिवसभर होते.
विजांचा गडगडाट नाही किंवा वादळीवारे नाही किंवा पाऊस पडेल, असे ढगाळ वातावरण देखील नव्हते. असे असताना सकाळी दहापासून वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, आर्चिणे, लोरे, वैभववाडी, एडगाव, कोकिसरे भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. अर्धा तासापेक्षा अधिक काळ पावसाळ्याप्रमाणे जोरदार सरी पडत होत्या. याशिवाय फोंडा परिसरातील काही गावांमध्येही सरी कोसळल्या. कोणत्याही चाहुलीशिवाय आलेल्या पावसाने सर्वाचीच तारांबळ उडाली. सकाळीच कामावर निघालेल्या शेकडो दुचाकीस्वारांना रस्त्यालगत असलेल्या निवारा शेडमध्ये आश्रय घ्यावा लागला. अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते.
जिल्ह्यात सध्या लग्नसराई सुरू आहे. याशिवाय सार्वजनिक, घरगुती स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांसाठी मंडपासह विविध प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. काही कार्यक्रमामध्ये पावसाचा व्यत्यय देखील आला. या पावसानंतर सर्व जिल्ह्यात दिवसभर पावसाचे वातावरण होते. सायंकाळी पुन्हा कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांमध्ये पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण होते. वातावरणात मोठे बदल झाले होते. आजच्या पावसाचा पूर्वपट्ट्यातील आंबा पिकावर परिणाम होणार आहे. या पट्ट्यातील आंबा हंगाम सुरू होऊन पाच ते सहा दिवसच झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रविवारपर्यत सावट
अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्याचा परिणाम राज्यातील विविध भागांसह कोकणात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अनेक भागात पाऊस झाला असला तर ११ मे पर्यत पावसाचे सावट कायम असणार आहे.