अखेर नव्या पोपची घोषणा, रॉबर्ट प्रीव्होस्ट यांचं नाव जाहीर
GH News May 09, 2025 02:08 PM

New Pope Robert Prevost : व्हॅटिकन सिटीमध्ये सिस्टीन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या रंगाचा धूर बाहेर आला आहे. याचाच अर्थ असा की चर्चच्या कार्डिनल्सनी पुढील पोपची निवड केलीआहे. अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ XIV म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा गुरुवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये वरिष्ठ कार्डिनल्सनी केली. रॉबर्ट प्रीवोस्ट हे पहिले अमेरिकन पोप ठरले आहेत.

सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर निघू लागल्यानंतर सुमारे 70 मिनिटांनी पोप लिओ सेंट पीटर बॅसिलिकाच्या मध्यवर्ती बाल्कनीत दिसले. 133 कार्डिनल इलेक्टर्सनी कॅथोलिक चर्चसाठी एक नवीन नेता निवडल्याचे यातून स्पष्ट झाले. फ्रान्सचे कार्डिनल डोमिनिक मॅम्बर्टी यांनी नवीन पोप म्हणून रॉबर्ट प्रीव्होस्ट यांचे नाव जाहीर केले. “आपल्याकडे एक पोप आहे,” असे त्यांनी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये जमलेल्या हजारो लोकांना सांगितले.

कोण आहेत रॉबर्ट प्रीवोस्ट?

69 वर्षीय रॉबर्ट प्रीव्होस्ट हे मूळचे शिकागोचे आहेत. प्रीव्होस्ट यांनी आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ पेरूमध्ये मिशनरी म्हणून घालवला आणि 2023 मध्येच ते कार्डिनल बनले. त्यांनी मीडियामध्ये खूप कमी मुलाखती दिल्या आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी क्वचितच बोलतात. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर, लिओ 267 वे कॅथोलिक पोप बनले. पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते आणि त्यांनी 12 वर्षे कॅथोलिक चर्चचे नेतृत्व केले.

पोप निवडीची प्रक्रिया कशी ?

कॅथोलिक परंपरेनुसार, पोप कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपची निवड केली जाते. यामध्ये, जगभरातील कार्डिनल्स पोपची निवड करतात. कार्डिनल्स हे कॅथोलिक चर्चमधील सर्वोच्च दर्जाचे पाद्री असतात. कार्डिनल हे जगभरातील बिशप आणि व्हॅटिकन अधिकारी असतात जे पोप वैयक्तिकरित्या निवडतात. कॉन्क्लेव्हमध्ये हे कार्डिनल नवीन पोप निवडण्यासाठी अनेक बैठका घेतल्या जातात.

नवीन पोपसाठी मतदान व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलमध्ये होते. 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्डिनल्सना मतदानाचा अधिकार असतो. मतदान आणि बैठकीची संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवली जाते. या काळात, कार्डिनल्सना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क साधण्याची परवानगी नसते.

कार्डिनल्स सीक्रेट बॅलेटद्वारे मतदान करतात. दररोज चार फेऱ्यांपर्यंत मतदान होतं आणि उमेदवाराला दोन तृतीयांश मते मिळेपर्यंत ते चालू राहते. ही प्रक्रिया एका स्पेशल मॉर्निंग गॅदरिंगने होते, जिथे 120 कार्डिनल्स सिस्टिन चॅपलमध्ये जमतात. हेच 120 कार्डिनल नवीन पोपची निवड करतात.

या महत्त्वाच्या बैठकीनंतर, कार्डिनल सर्वांना निघून जाण्यास सांगतात. त्याआधी, हे कार्डिनल गोपनीयतेची शपथ घेतात आणि नवीन पोपची निवड होईपर्यंत स्वतःचा वावर कॉन्क्लेव्हपर्यंतच मर्यादित ठेवतात. मतदानाच्या पहिल्या दिवशी नवीन पोप निवडला जाईल याची कोणतीही हमी नसते. .

काळ्या आणि पांढऱ्या धुराचा अर्थ काय ?

त्यानंतर निकाल जाहीर करण्यासाठी तीन कार्डिनल नियुक्त केले जातात. हे कार्डिनल प्रत्येक मतपत्रिकेचे निकाल मोठ्याने वाचतात. जर कोणत्याही उमेदवाराला आवश्यक दोन तृतीयांश मते मिळाली नाहीत तर मतपत्रिका चुलीत जाळली जाते. या मतपत्रिका जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे अत्यंत काळा धूर निघतो.

मात्र, जेव्हा एखाद्या उमेदवाराला एका फेरीत आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश मते मिळतात, तेव्हा कार्डिनल्स कॉलेजच्या डीनला विचारले जाते की तो हे स्वीकारेल का ? जर त्यांचे उत्तर हो असेल आणि त्यांनी स्वीकार केला तर यानंतर शेवटच्या फेरीतील मतपत्रिका जाळल्या जातात पण यावेळी मतपत्रिका जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमधून पांढरा धूर निघतो. ज्यामुळे नवीन पोपची निवड झाली आहे, हे बाहेरील जगाला कळतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.