भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती खूपच तणावपूर्ण बनली आहे.
या घटनेवर जगातील अनेक देशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये चीनचाही समावेश आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यांना 'निराशाजनक' म्हटलंय. शिवाय या परिस्थितीमुळे आपण 'चिंताग्रस्त' असल्याचं मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, "भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत आणि नेहमीच राहतील. तसेच ते दोघं चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो."
तसेच, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दोन्ही देशांना "शांतता राखण्याचं, संयम बाळगण्याचं आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करतील अशा कारवाया टाळण्याचं" आवाहन केलं आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार, चीननं पाकिस्तानात केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून पाकिस्तान अस्थिर होऊ नये, अशी चीनची कायम इच्छा राहील.
आहे.
तसेच, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) आणि बेल्ट अँड रोड अंतर्गत चीन पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.
अशा परिस्थितीत मध्य आशियाला रस्त्यानं जोडण्याचं आपलं स्वप्न अपूर्ण राहू नये, अशीच चीनची इच्छा राहील.
या मुद्द्याशी पूर्णपणे सहमत असलेले चिनी प्रकरणांचे तज्ज्ञ आणि बेनेट विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. तिलक झा म्हणतात, "जर या प्रदेशात तणाव वाढला, तर त्याचा थेट परिणाम चीनच्या गुंतवणुकीवर आणि स्वप्नांवर होईल. त्यामुळे त्यांचे हितसंबंध प्रभावित होतील असं काहीही कधीच घडू नये अशीच चीनची इच्छा राहील."
चीन आणि पाकिस्तानमधील मैत्रीचीन आणि पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध 21 मे 1951 रोजी सुरू झाले.
पाकिस्तान आणि चीनमध्ये अनेक दशकांपासून संरक्षण सहकार्य आणि राजनैतिक संबंध आहेत. या काळात पाकिस्तानचं चीनवरील अवलंबित्व आर्थिकदृष्ट्याही वाढलं आहे.
चीननं पाकिस्तानला शस्त्रास्त्रं पुरवठा तर केला, पण भारताविरुद्धच्या कोणत्याही युद्धात त्यानं पाकिस्तानला थेट पाठिंबा दिला नाही.
जेव्हा भारताची पाश्चिमात्य देशांशी जवळीक वाढली तेव्हा पाकिस्तान चीनकडं झुकत गेला.
कर्जापासून ते FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या कठोर कारवाईपासून वाचण्यासारख्या अनेक प्रसंगांमध्ये चीन पाकिस्तानला मदत करण्यासाठी पुढं धावून आला आहे.
परंतु या काळात चीननं भारतासोबतच्या संबंधांमध्येही संतुलन राखलं आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील चायना स्टडीजचे प्राध्यापक आर. वारा प्रसाद म्हणतात, "चीनला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध किंवा तशी परिस्थितीही कधीच नको असेल. जर युद्ध झालं तर चीनच्या हितसंबंधांवर परिणाम होईल आणि मध्य आशियामध्ये त्याला संकटाचा सामना करावा लागेल."
ते म्हणतात की, सध्या चीनचा अमेरिकेसोबत टॅरिफबाबत वेगळ्या पातळीवर तणाव आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत चीनचे भारतासोबतचे संबंध चांगले राहावेत असाच चीनचा प्रयत्न असेल.
प्रसाद म्हणतात, "चीन असंही स्वतःच्या हितसंबंधांकडे अधिक झुकलेला असतो. त्यामुळे तो कोणत्याही वादात अडकू इच्छित नाही. हेच कारण आहे की चीननं भारताविरुद्धच्या कोणत्याही युद्धात कधीही पाकिस्तानला थेट पाठिंबा दिलेला नाही."
डॉ. तिलक झा म्हणतात, "सध्या चीनला पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवरील शिनजियांग प्रांतात विकास हवा आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याचा 'चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' प्रकल्प आणि बेल्ट अँड रोड प्रकल्प पाकिस्तानमध्ये यशस्वी होईल. भारत आधीच त्याला विरोध करत आहे. अशा परिस्थितीत विरोधाची तीव्रता आणखी वाढू नये असं चीनला वाटत असेल."
चीन-पाकिस्तान द्विपक्षीय व्यापारचीन सध्या पाकिस्तानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि आयातीचा सर्वात मोठा स्रोतही आहे.
चीनच्या सीमाशुल्क विभागाच्या मते, 2024 मध्ये चीन आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार 23.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यात वाढ झाली आहे.
तर चीनची पाकिस्तानला होणारी निर्यात 17 टक्क्यांनी वाढून 20.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे आणि आयात 18.2 टक्क्यांनी घसरून 2.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे.
2024 मध्ये चीननं पाकिस्तानला सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांची निर्यात केली. ज्याचं बाजार मूल्य सुमारे 5.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं होतं.
यापैकी 35 टक्के सेमीकंडक्टर उपकरणे होती आणि 27 टक्के टेलिफोन संच होते. यात स्मार्टफोनचाही समावेश होता.
चीननं पाकिस्तानला 2.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचे अणुभट्टे, बॉयलर, यंत्रसामग्री आणि यांत्रिक उपकरणं निर्यात केली आहेत.
त्याबरोबरच 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीची लोखंड आणि पोलाद उत्पादनंही निर्यात केली आहेत.
डॉ. तिलक झा म्हणतात, "जेव्हा तुम्ही एखाद्या देशाशी इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार करता तेव्हा तेथील परिस्थिती चांगली असावी असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, जेणेकरून तुम्हाला आर्थिक हितसंबंध साध्य करता येतील."
आर. वारा प्रसाद म्हणतात, "पाकिस्तानमधील चीनच्या प्रकल्पावर आधीच अनेक धोके निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही शेजारी देशांमधील तणावाची परिस्थिती ही चीनसाठी हिताची राहणार नाही."
ते म्हणतात, "पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांपुढं आधीच सुरक्षेचं संकट आहे. त्यात जर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर त्यांचे सर्व प्रकल्प धोक्यात येतील."
चीनचं हितअमेरिकेसोबत वाढलेल्या अंतरानंतर पाकिस्ताननं चीनकडं वळायला सुरुवात केली आहे.
सध्या चीन आणि पाकिस्तान केवळ संयुक्त लष्करी सराव करत नाहीत, तर पाकिस्तान चीनकडून मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं देखील खरेदी करतो.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला झालेल्या शस्त्रास्त्र आयातीपैकी 81 टक्के शस्त्रास्त्रं चीनमधून आयात केली गेली आहेत.
गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानात आलेली पाचपैकी चार शस्त्रं चिनी आहेत. चीननं पाकिस्तानला पीएल-15 क्षेपणास्त्रे दिली आहेत.
पीएल-15 आणि एसडी-10 सारखी क्षेपणास्त्रं चीनच्या आधुनिक बीव्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली जातात. या क्षेपणास्त्रांमध्ये लांब अंतरावरून हवेतच विमानांना नष्ट करण्याची क्षमता आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर बीबीसी उर्दूनं माजी पाकिस्तानी राजनयिक अधिकारी तस्नीम असलमला चीनच्या वृत्तीबद्दल प्रश्न विचारला होता.
त्या म्हणाल्या की, चीनला पाकिस्तानमधून आखाती देशांमध्ये जाण्यासाठी प्रवेश मिळतो.
तस्नीम असलम म्हणाल्या, "चीन हा या प्रदेशातील एक मोठा देश आहे, ज्याचे दोन्ही प्रतिस्पर्धी देशांशी व्यापारी संबंध आहेत. या प्रदेशात शांतता राखणं चीनच्या हिताचं आहे. चीनसाठी त्याच्या आर्थिक हितांचं संरक्षण करणं गरजेचं आहे."
झा म्हणतात, "दोन्ही देशांमधील शांतताच चीनच्या विकासाला मदत करेल. अन्यथा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही जर सुरक्षा संकट आणि अस्थिरता कायम राहिली, तर चीन त्या प्रकल्पाचा व्यावसायिक फायदा कसा घेऊ शकेल? सध्या ग्वादर बंदर तयार आहे, पण शांतता असेल तेव्हाच चीन त्याचा फायदा घेऊ शकेल."
चीनला वादात पडायचं नाहीभारत, पाकिस्तान आणि चीन संबंधांबद्दल आर. वारा प्रसाद म्हणतात, "चीन नेहमीच दोन्ही बाजूंना संयम बाळगण्यास सांगतो. कोणत्याही वादात अडकण्याची त्याची इच्छा नाही."
"चीन आताही तेच करत आहे. चीन अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धात अडकला आहे. या वस्तुस्थितीमुळे त्याला असं करणं भाग आहे. म्हणूनच तो भारतासोबत नवीन आघाडी उघडू इच्छित नाही," असंही प्रसाद नमूद करतात.
भारत हा चीनचा एक मोठा व्यापारी भागीदार आहे, म्हणूनच त्याला भारतासोबत चांगले संबंध राखायचे आहेत.
प्रसाद सांगतात की, भारतालाही दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत इस्रायलप्रमाणं जगाचा पाठिंबा हवा आहे. परंतु राजनैतिक आघाडीवर पाकिस्तानला पाठिंबा देऊन चीन भारताचा राजनैतिक प्रभाव कमी करतो.
तिन्ही देशांमधील संबंधांबद्दल तिलक झा म्हणतात, "हे सर्व देश केवळ प्रतिस्पर्धी नसून एकमेकांचे शेजारी देखील आहेत. अशा परिस्थितीत जर या प्रदेशात काही अस्थिरता निर्माण झाली, तर सर्वांनाच त्याचं नुकसान सोसावं लागेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)