आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु होता. 8 मे रोजी ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या तारखेनुसार हा सामना सुरु झाला. धर्मशाळेतील मैदानावर खेळ सुरुही झाला. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती, 10.1 षटकात 122 धावा केल्या होत्या. एक विकेट पडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात उतरला आणि सामना रद्द झाल्याची घोषणा झाली. यानंतर खेळाडू आणि आयपीएलशी निगडीत स्टाफला सुरक्षित ठिकाणी नेलं. तर प्रेक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं. खरं तर हा सामना आयपीएल प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे या सामन्याचा नेमका निकाल काय याबाबत अजूनही संभ्रम आहे. या सामन्याचा काहीही निकाल दिला तरी त्याचा परिणाम गुणतालिकेवर होणार हे निश्चित आहे.
गुजरात टायटन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु प्रत्येकी 16 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पंजाब किंग्स 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स हा संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्याचा काहीही निकाल लागला तर त्याचा गुणतालिकेवर परिणाम होईल. खासकरून टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची लढाई चुरशीची होईल.
पंजाब दिल्ली सामना रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला तर या दोन्ही संघांच्या स्थितीत काही बदल होणार नाही. कारण पंजाब किंग्सचे 16 , दिल्ली कॅपिटल्सचे 14 गुण होतील. या दोन्ही संघांचा नेट रनरेट त्यांच्या वर असलेल्या संघाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे तशीच पोझिशन राहील.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना झाला आणि निकाल लागला तर चित्र वेगळं असेल. पंजाब किंग्सने हा सामना जिंकला तर गुणतालिकेत 17 गुणांसह थेट पहिल्या स्थानावर जाईल. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला तर 15 गुणांसह तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी राहील. पंजाबपेक्षा नेट रनरेट चांगला असेल तर तिसऱ्या स्थानी, अन्यथा चौथ्या स्थानी राहील.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सबाबत अजूनही बीसीसीआयने ठोस असा निर्णय घेतलेला नाही. फ्रेंचायझी आणि बोर्ड बैठकीनंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे. यानंतर सामन्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.