Satara: राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास काय हाेईल; जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना?
esakal May 09, 2025 02:45 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत खासदार शरद पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांत चर्चेला उधाण आले आहे. असे झाल्यास आम्हाला आनंदच वाटेल, अशी भावना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्ते व नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे, तसेच संपूर्ण पवार कुटुंब एकत्र यावे असे सर्वांना वाटत आहे. आता हा निर्णय पवार कुटुंबानेच करावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र आले, तर आश्चर्य वाटायला नको, अशी सूचक विधान केले आहे. याबाबत त्यांनी म्हटले, की राष्ट्रवादीतील दोन गटांनी एकत्र यायचे की नाही, हे राष्ट्रवादीतील नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. कारण आता मी त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली, तरी विचाराने ती एकत्र आहेत. एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी ठरवावे.

या विधानामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही गटांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांतून याबाबत पवार कुटुंबाने निर्णय घ्यावा. संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असावे, असे आम्हाला वाटत असल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील म्हणाले, ‘‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत खासदार शरद पवार यांनी आशेचा किरण दाखवला आहे. दोन्ही गट एकत्र यावेत ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. संपूर्ण पवार कुटुंब एक असावे, असेच सर्वांना वाटत आहे; पण एकत्र येण्याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.’’

मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी दोन गट झालेले असले, तरी विचाराने ही सर्व मंडळी एकच आहेत. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या सारखा एकसंध व्हावा, अशी भावना आहे. त्यामुळे असे झाल्यास आम्हालाही आनंद वाटेल. याबाबत पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे निर्णय घेतला तर पक्षाची ताकद वाढणार आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.