भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा धसका पाकिस्तानने चांगलाच घेतला आहे. त्याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत उमटत आहे. ”अल्लाह हमारी हिफाजत करे” म्हणत पाकिस्तानच्या संसदेमध्ये पीएमएलएनचे (पाकिस्तान मुस्लिम लीग) खासदार ताहीर इक्बाल चक्क रडू लागले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता पाकिस्तानी खासदार शाहिद अहमद यांनी संसदेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झाप- झाप झापले आहे.
खासदार शाहिद अहमद यांनी संसदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना जोरदार फटकार लावले आहेत. ते म्हणाले, आमचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यास घाबरतात. ते घाबरट आहे. मला टिपू सुलतान यांचे एक वाक्य आठवते. एका लष्करात सिंह असले आणि त्याच्यासोबत कोल्हे असतील तरी ते सिंहासारखे लढतात. परंतु सिंहाचा सरदार कोल्हा असेल तर ते सिंहासारखे लढू शकत नाही. ते युद्धात पराभूत होतात. तुमचे नेतृत्व घाबरणारा असेल तर काहीच करु शकत नाही, असे खासदार शाहिद अहमद यांनी म्हटले.
शाहिद अहमद हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे सदस्य आहेत. ते म्हणाले की, शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांचे नावही घेतले नाही. त्याचे व्यावसायिक संबंध आहेत. ते त्याचे नावही घेऊ शकत नाहीत. तसेच नवाझ शरीफ यांनी भारताबद्दल एकही विधान केले नाही, असा घरचा आहेर खासदार शाहिद अहमद यांनी दिला.
शाहिद अहमद याच्यापूर्वी पाकिस्तानी खासदार ताहीर इक्बाल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ते संसदेत रडले होते. ते म्हणाले होते, अल्लाह आमचे रक्षण करो… आपल्या देशाचे रक्षण करो. आपण गुन्हेगार आहोत. आपण कमी पडत आहोत. मजबूर आहोत. जगभरात जिथे बघावे तिथे मुस्लिमांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी एकत्रित येऊन शत्रूंना धडा शिकवला पाहिजे, असे इक्बाल यांनी म्हटले होते.