भारत-पाक युद्धादरम्यान मुंबईकरांच्या जीवाला किती धोका? मुंबईकरांनी नेमकं काय करायचं? उपमुख्यमंत्री म्हणाले- सध्या..
esakal May 09, 2025 10:45 PM

सध्या भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध हा जगभरातील चर्चेचा विषय ठरला आहे. या युद्धात सीमेलगत सतत गोळीबार सुरू आहे. भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बस्फोट करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. मात्र तरीही पाक शरण येण्यास तयार नाही. नौदल, हवाईदल आणि भूदल हे सगळेच सैन्य आता पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जसे भारताने पाकिस्तानच्या मुख्य शहरांवर बॉम्बहल्ले केले तसे पाकिस्तानही भारताच्या मुंबई, दिल्लीसारख्या शहरांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात आता नुकतीच मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडलीये.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इतर मुख्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सूचना दिल्या आहेत. लोकांना घाबरण्याची गरज नाही. सरकार त्यांची काळजी घेईल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था केली आहे... आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू असं म्हणत त्यांनी मुंबईकरांना घाबरून न जाता शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, 'सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची इतर मंत्र्यांसोबत आणि पोलीस अधीक्षकांसोबत मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यात सविस्तर चर्चाही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सगळे विभाग या बैठकीला हजर होते. निश्चित रूपाने, कोणत्याही नागरिकाला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. पॅनिक होण्याची गरज नाहीये पण सजग राहा. सरकार तुमची काळजी घेण्यास सक्षम आहे. '

ते पुढे म्हणाले, 'आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने योग्य तो बंदोबस्त केला आहे. जेव्हा जेव्हा काही गरज पडेल तेव्हा केंद्र सरकारच्या सूचनांनुसार त्या गोष्टी अमलात आणल्या जातील. केंद्र सरकार जशा सूचना करेल तशी इथे अंमलबजावणी केली जाईल. इथल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्टगार्ड यांच्याशी बोलून त्यांना ज्या मदतीची गरज आहे ती मदत आमचं सरकार त्यांना निश्चितच पोहोचवेल.' एकूणच भारत पाकिस्तान युद्ध सुरू असलं तरी सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.