भारताने काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’मधून घेतला. भारताच्या या कारवाईमुळे बावचाळलेल्या पाकिस्तानचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा नापाक प्रयत्न हाणून पाडला. भारतीय सैन्याने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त केली. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याने भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. या दोन्ही देशातील तणावाचा परिणाम क्रिकेटवर पाहायला मिळाला आहे. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. परिस्थिती पाहून आयपीएल 2025 मधील उर्वरित सामन्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 5 सामने नियोजित आहेत. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यांबाबत काय निर्णय घेणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
यंदा आशिया कप 2025 स्पर्धा (Mens Asia Cup 2025) खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतही टीम इंडिया-पाकिस्तान सामना होणार होता. या स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासून शेजारी देशांना एकाच गटात ठेवण्यात येत होतं. दोन्ही संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे दोन्ही संघात पुढील फेरीत आणखी एक सामना होण्याची शक्यता असते. त्यानुसार यंदाही आशिया कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 2 वेळा सामना होण्याची शक्यता होती. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप स्पर्धेचं आयोजन होणार की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
तसेच आगामी वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताकडे आहे. ही स्पर्धा रॉबिन राउंड फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे. अर्थात प्रत्येक संघ स्पर्धेतील इतर संघांविरुद्ध किमान 1 सामना खेळणार. त्यानुसार भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार हे स्पष्ट आहे. मात्र हा सामनाही रद्द होऊ शकतो.
तसेच 2026 मध्ये होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीत 2 शेजाऱ्यांमध्ये किमान 1 सामना होतोच. तसेच 2026 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-पाकिस्तान असा 1 सामना होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यांबाबत काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.