Washim: ४ दिवसांपूर्वी लग्न, अंगावरची हळद ओळीच, सीमेवरून बोलावणं आलं; कृष्णा अंभोरे कर्तव्यावर रवाना
Saam TV May 09, 2025 11:45 PM

लग्नानंतर प्रत्येकजण आपल्या नव्या संसाराच्या स्वप्नात रमलेला असतो. नवविवाहित जोडीदारासोबतच्या जीवनाची सुंदर चित्रं मनात रंगवतो. मात्र, कृष्णा राजू अंभोरे या जवानाने अंगावरची हळद ओळी असतानाच देशसेवेला प्राधान्य दिलं आहे. लग्नाच्या केवळ चार दिवसांत सैन्यदलाकडून कर्तव्यासाठी बोलावणं आलं आणि त्यांनी कुठलाही विचार न करता राष्ट्रसेवेच्या हाकेला प्रतिसाद दिला.

कृष्णा अंभोरे हे मुळचे जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावचे सुपुत्र. ४ दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना त्यांना सीमेवरून बोलवणं आलं. देशसेवा आणि देशप्रेम हे प्रथम असल्यामुळे त्यांनी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला.

नवविवाहित पत्नीला मागे सोडून जाताना कृष्णा अंभोरे यांचं मन गहिवरलं होतं. डोळ्यांत भावनांचा कल्लोळ होता, अश्रुंचा बांध फुटला. तरीही राष्ट्रसेवेच्या ओढीमुळे त्यांनी सीमेवर तैनात राहण्याचा निर्णय घेतला.

आज दुपारी २.३० वाजता कृष्णा अंभोरे उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र जमला. गावकऱ्यांनी देशभक्तीच्या जयघोषांनी त्यांना निरोप दिला. यावेळी गावकऱ्यांकडून “जय जवान”, “वंदे मातरम्” अशा घोषणा दिल्या जात होत्या, आणि स्टेशनचं वातावरण देशभक्तीने भारावून गेलं होतं.

वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि कौतुक झळकत होतं. कृष्णा अंभोरे यांचा हा निर्णय केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. "देश आधी, बाकी नंतर" हे त्याने आपल्या कृतिशील निर्णयातून सिद्ध केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.