जागेच्या वादातून मारहाण; सहा जणांवर गुन्हा
esakal May 09, 2025 11:45 PM

पिंपरी : जागेच्या वादातून महिला व तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वाकड परिसरातील माउली चौक येथे घडली. याप्रकरणी माउली चौक येथील ४० वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋतिक सुनील ढसाळ (वय २५), गौरव सुनील ढसाळ (वय २२), सुनील ढसाळ (वय ५०), रोहित नामदेव सोनवणे (वय २३), मोहित महादेव सोनवणे (वय २०) आणि सोनू (सर्व रा. माउली चौक वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आपसात संगनमत करीत आमची जागा खाली करा, असे म्हणत फिर्यादी आणि त्यांच्या मुलास शिवीगाळ करत सिमेंटचे गट्टू डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान, भांडण सोडविण्यास आलेल्या दोन महिलांनाही आरोपींनी मारहाण केली.

डेबिट कार्डची माहिती घेऊन फसवणूक
पिंपरी : एका नागरिकाचे डेबिट कार्ड एटीएममध्ये अडकल्यानंतर मदतीच्या बहाण्याने माहिती मिळवून एक लाख २४ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना रहाटणीतील नखातेवस्ती येथे घडली. याप्रकरणी एका ४७ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एका नागरिकाचे डेबिट कार्ड एटीएम मशिनमध्ये अडकले. त्यावेळी फिर्यादी यांनी एका मोबाईल नंबरवर फोन केला असता मोबाइलवरील व्यक्तीने फिर्यादी यांच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन एटीएम मशिनची बटणे दाबायला सांगून त्यांच्या खात्यातील एक लाख २४ हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने काढले.

कंपनीतील सहकाऱ्यांकडून जातिवाचक वक्तव्य व शिवीगाळ
पिंपरी : एकाच कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तिच्या सहकाऱ्यांनी जातिवाचक वक्तव्य करून शिवीगाळ केली. ही घटना बालाजीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ताजणे मळा, चऱ्होली येथे राहणारी महिला (वय ३४) आणि बालाजीनगर येथे राहणारी महिला (वय ४५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेला पाहून जातिवाचक वक्तव्य केले तसेच शिवीगाळ करीत धमकी दिली.

गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे करण्यात आली. विजय लक्ष्मण काळुंखे (वय २१, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या भिंतीलगत असलेल्या पदपथावर असलेल्या एका व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विजय काळुंखे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २८ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा सापडला.

कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी
पिंपरी : भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी गावच्या हद्दीतील चिंबळी फाटा येथे घडली. प्रशांत गंगाधर तापकीर (वय ३१, रा. मोशी) व त्यांचा मित्र स्वप्निल पंडित पांचाळ (वय ३१, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. याप्रकरणी विकास शिवाजी खाकाळ (रा. चोविसावाडी, ता. हवेली, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तापकीर आणि पांचाळ हे दोघेजण कामावर चालले होते. ते चिंबळी फाटा येथे आले असता समोरून आलेल्या कंटेनरने दुभाजक ओलांडून दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तापकीर आणि पांचाळ या दोघांच्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली.

गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक
पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी मोई गाव येथील एका ५१ वर्षीय महिलेला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तर एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई भोसरी येथे करण्यात आली. पुणे-नाशिक महामार्गावरील लांडगेनगर येथे एका महिलेच्या पिशवीत गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये २० हजार ७०० रुपये किमतीचा गांजा सापडला. हा गांजा तिने शितोळे नावाच्या दुसऱ्या महिलेकडून आणल्याचे तिने सांगितले आहे.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.