जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या ऑपरेशनची चर्चा पाकिस्तानमध्ये सर्वत्र होत आहे. त्याचवेळी पाकिस्तान सर्व आघाड्यांवर कमकुवत ठरत असल्याचे टीका केली जात आहे. देशातील विरोधी पक्षही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधील विरोधी पक्ष पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका करत आहे. आता पाकिस्तानमधील टीव्हीवरील ‘लाईव्ह शो’मध्ये भारताचे भरभरुन कौतूक करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी भारताची स्तुती केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पीसीबीचे माजी अध्यक्ष असलेल्या नजम सेठी यांना वृत्तवाहिनीवरील अँकर भारत-पाकिस्तानसंदर्भात प्रश्न विचारते. त्यावर नजम सेठी म्हणतात, पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला साथ देणारे कोणी नाही. अबर देशांनीही पाकिस्तानची साथ सोडली आहे. ते ही भारताच्या पाठिशी आहेत. अमेरिका आता पाकिस्तानला साथ देत नाही. इराण आणि अफगाणिस्तानसोबत आमचे चांगले संबंध नाही.
नजम सेठी यांच्या या वक्तव्यानंतर अँकर प्रश्न विचारते, भारतातील अंतर्गत परिस्थितीही चांगली नाही, बांगलादेशसोबत त्यांचे संबंध बिघडले आहेत? त्यावर नजम सेठी म्हणतात, आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारताचा दरारा आहे. पण दुर्देवाने आमच्यासोबत कोणी नाही. विदेशातील सर्व गुंतवणूक भारताकडे जात आहे. सौदी अरेबिया, युएई डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहे. पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. भारत आणि बांगलादेशाचा विषय छोटा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पकड मजबूत आहे. भाजपचे वर्चस्व कायम आहे. भारतात सर्व नियंत्रणात आहे. विरोधक कमकुवत आहेत, असेही नजम सेठी यांनी म्हटले आहे. नजम सेठी हे 2013 ते 2018 पर्यंत पीसीबीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. 2018 मध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पीसीबीचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले. 22 जून 2023 पर्यंत ते या पदावर होते.