छत्रपती संभाजीनगर - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे, त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यात छत्रपती संभाजीनगरात भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), तसेच शिवसेना यूबीटी, काँग्रेस या पक्षांच्या मतविभागणीत ‘एआयएमआयएम’ (अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) या पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरीही एमआयएममधील अंतर्गत वाद आणि केवळ दलित मतांवर या पक्षाची मदार यामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरवातीला एमआयएमने चांगली मजल मारली. राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. जिल्ह्याला एक खासदार आणि एक आमदार या पक्षाने दिला. त्यामुळे शहरात एमआयएमला मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘पूर्व’ मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलील यांना ९० हजार मते मिळाली होती तर ‘मध्य’मधून नासेर सिद्दिकी हे ८० हजार मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या मतांचा फायदा पक्षाला होऊ शकतो.
तसेच शहरामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तर शिवसेना यूबीटी या पक्षासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेही उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. त्यामुळे या पक्षाच्या तिकिटांच्या वाटाघाटीत अनेक ठिकाणी एमआयएमला फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र असे असले तरीही मुस्लिम समाजाव्यतिरिक्त एमआयएमला काही तुरळकच मते इतर समाजाची मिळतात.
यात दलित समाजावर एमआयएमची मदार असणार आहे. यासोबत दुसरीकडे या पक्षातही अंतर्गत कलहामुळे अनेक नेत्यांनी इतर पक्षांत प्रवेश केला आहे. आजही अंतर्गत वादविवाद सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत किती नगरसेवक निवडून येतील, हे येणारा काळच ठरवेल.
गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय कारभार असला तरीही एमआयएमच्या नगरसेवकांनी वॉर्डांत जाऊन काम केले आहे. त्यामुळे इलेक्शन असो किंवा नसो, आमची तयारी झालेली आहे. यावेळेस ४० ते ४५ नगरसेवक निवडून येणार असून, महापौर आमचाच होईल.
- नासेर सिद्दिकी, माजी गटनेता