National Award Winning Artist Vikram Gaikwad Passes Away: प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचे शनिवारी, १० मे २०२५ रोजी सकाळी मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. कोरोना काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. मागील आठवड्यात प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी असा परिवार आहे.
यांनी आपल्या कारकिर्दीत 'सरदार', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', '', 'दंगल', 'संजू', '83', 'पीके', 'पानिपत' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यांच्या उत्कृष्ट रंगभूषेच्या कौशल्यामुळे त्यांनी 'मोनार मानुष', 'बालगंधर्व', 'द डर्टी पिक्चर', 'जातिष्वर' यांसारख्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले.
त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, "राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे आज दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने रंगभूषेतून पडद्यावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा एक जादुगार आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त रंगभूषाकार आपल्यातून निघून गेला असून कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. माझ्या तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने विक्रम गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
विक्रम गायकवाड यांच्यावर आज, १० मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकाची लाट पसरली आहे. सुबोध भावे, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.