निरगुडसर, ता. १० : पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ व्यक्तीकडून एकूण दीड तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या चोरट्याने लांबवल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर- पारगाव रस्त्यावर दातखिळे मळा फाट्यावर शुक्रवारी (ता. ९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश दत्तात्रेय कुलकर्णी (वय ७९, रा. शिंगवे, ता. आंबेगाव) हे शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निरगुडसर येथील दातखिळेमळा फाटा येथील पत्रा कंपनीजवळ पारगाव- निरगुडसर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून मोटार सायकलवरून आलेल्या अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, अंगात पिवळे रंगाचे जर्कीन, खाक्या रंगाची फूल पॅन्ट, मराठी बोलता येणाऱ्या अज्ञात व्यक्तीने, ‘मी पोलिस आहे,’ अशी बतावणी करत पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून फिर्यादी यांच्या बोटातील सोन्याच्या ८ ग्रॅम, ४ ग्रॅम व ३ ग्रॅम, अशा एकूण दीड तोळ्याच्या तीन अंगठ्या चोरट्याने चोरून नेल्या. याबाबत अज्ञात चोरट्यावर पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे हे करत आहेत.