भारत पाकिस्तान यांच्यात 3 दिवसांपासून तणाव सुरु आहे. दोन्ही देशात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र त्यानंतर दोन्ही देशात संमतीने युद्धविराम जाहीर करण्यात आलं. याबाबत शनिवारी 10 मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली. संध्याकाळी 5 वाजता यु्द्धविराम जाहीर करण्यात आलं. मात्र युद्धविरामाच्या जवळपास 3 तासांनंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. पाकिस्तानच्या या कृतीनंतर पुन्हा एकदा संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय.
पाकिस्तानने सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याने टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने संताप व्यक्त केला आहे. सेहवागनने पाकिस्तानची तुलना कुत्र्याच्या शेपटीसह केली आहे. सेहवागने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही कॅप्शनशिवाय एक फोटो पोस्ट केला आहे. “कुत्र्याचं शेपूट हे वाकड्याचं वाकडंच राहतं”,असा उल्लेख सेहवागने पोस्ट केलेल्या फोटोत आहे. सेहवागने हा फोटो पाकिस्तानच्या नावासह पोस्ट केलेला नाही. मात्र सद्यस्थिती पाहता सेहवागने हा फोटो पाकिस्तानसाठी उद्देशून केलाय, यात शंका नाही.
दरम्यान भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर‘अंतर्गत पाकिस्तानवर कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याने 8 मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवाद्यांची तळं उडवून लावली. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचं प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्त्यांवर कारवाई केली नाही. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतातील सीमेलगतच्या गावांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांचे हे नापाक मनसुबे हाणून पाडले.
सेहवाग म्हणाला, कुत्र्याचं शेपूट…
भारताने त्यानंतर या कारवाईला जोरदार उत्तर देत पाकिस्तानमधील काही शहरावंर ड्रोन हल्ले केले. यात अनेक ठिकाण उद्धस्त झाले. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्धवस्त झाल्याने पीएसएलमधील उर्वरित सामने स्थगित करण्यात आले. त्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाली नाही. त्यांनी पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने प्रत्येक हल्ला हा परतवून लावला. भारताने आतापर्यंत प्रत्येक बाबतीत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलंय. त्यांची प्रत्येक बाबतीत आणि चारही बाजूने कोंडी केलीय. मात्र त्यानंतरही पाकिस्तानची कुरापत सुरुय. त्यामुळे केंद्र सरकारकडून सैन्याला फ्री हँड दिलाय. त्यामुळे पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही तर त्यांना आणखी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.