Manchar News : मंचर बस स्थानकावर पाच नव्या एसटी बसचे जल्लोषात स्वागत; लवकरच अद्ययावत बस स्थानकाचे बांधकाम : दिलीप वळसे पाटील
esakal May 11, 2025 04:45 AM

मंचर : बस स्थानकावर शनिवारी (ता.१०) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पाच नव्या लालपरींचे आगमन झाले. या नव्या बसेसचे फटाके व पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक नागरिक, प्रवासी, आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते लाल परिंचे स्वागत करण्यात आले.यावेळी म्हाडा गृहनिर्माणचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ,शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,बाजार समितीचे सभापती निलेश थोरात,दत्ता थोरात, नंदकुमार काळे,सुषमा शिंदे , भाजपचे संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, बाबू थोरात,.उपस्थित होत्या.विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, तांबडेमळा आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी,मंचर बसस्थानक प्रमुख साधना कालेकर यांनीं मान्यवरांचे स्वागत केले.

दिलीप वळसे पाटील म्हणाले “आंबेगाव तालुक्याचे मंचर प्रमुख केंद्र असून येथे प्रवाशांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे मंचर बस स्थानकाचे नव्याने अत्याधुनिक सुविधांसह अद्ययावत बांधकाम करण्यात येणार असून बारामतीच्या बसस्थानकाप्रमाणे येथील बांधकाम केले जाईल .तसेच तांबडे मळा आगाराच्या आवारात सिमेंट काँक्रिटीकरण केले जाईल त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ.

येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तातडीने सादर करा. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व मार्गावर वेळेत एसटी गाड्या गेल्या पाहिजेत. तसेच मंचर बस स्थानकावरील स्वच्छतेकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तांबडे मळा आगारासाठी पूर्ण वेळ आगार प्रमुखाची नियुक्ती बाबत व अजून पाच नवीन एस टी गाड्या उपलब्ध होण्यासाठी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बरोबर चर्चा केली जाईल.

“मंचरहून पुणे, नाशिक , भीमाशंकर तसेच विध्यार्थ्यांसाठी वडगावपीर ,पारगाव,कुरवंडी ,महाळुंगे पडवळ ,रांजणी ,भागडी,आहुपे या मार्गांवर एस. टी. बस नियमित धावणार आहेत. दळणवळणात लक्षणीय सुधारणा होईल”. असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. मोहम्मद सय्यद,सारिका गावडे,छगन शेवाळे,वैभव बाणखेले यांच्या सह कर्मचार्यांनी व्यवस्था पहिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.