रोहित शर्मा याच्यानंतर आता विराट कोहली कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विराट इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर बीसीसीआय विराटची मनधरणी करतेय, असाही दावा केला जात आहे. अशात टीम इंडियाचा माजी विकेटकीपर बॅट्समन अंबाती रायुडू याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत विराटच्या निवृत्तीच्या चर्चेवरुन आपलं मत मांडलं आहे. रायुडूने विराटला विनंती केली आहे. तु निवृत्त होऊ नकोस, तुझी टीमला आधीपेक्षा अधिक गरज आहे, असं रायुडूने म्हटलंय.
रायुडूने विराटला त्याच्या कथित कसोटी निवृ्त्तीच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. “विराटशिवाय टीम इंडिया आधीसारखी राहणार नाही. “विराट कोहली, कृपया निवृत्त होऊ नको. भारताला तुझी आधीपेक्षा जास्त गरज आहे. तुझ्याकडे अजून खूप काही आहे. तुझ्याशिवाट कसोटी क्रिकेट आधीसारखं राहणार नाही. कृपया पुनर्विचार करावा”, अशी विनंती रायुडूने विराटला या पोस्टद्वारे केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, विराटने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्त होणार अलल्याचं बीसीसीआयला सांगितलं आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. उभयसंघात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच या मालिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने याआधी सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक दिली. मात्र भारताला दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मायदेशात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका गमावल्याने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची संधी हुकली.
अंबाती रायुडूची एक्स पोस्ट
दरम्यान विराट कोहली याला कसोटीत 10 हजार धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे. विराटने 2011 साली कसोटी पदार्पण केलं आहे. विराटने तेव्हापासून एकूण 123 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9 हजार 230 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटने कथित निवृत्तीच्या निर्णयाबाबत फेरविचार केला तर तो 10 हजार धावांच्या आणखी जवळ पोहचू शकतो.