चास, ता.११ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. उन्हाळी बाजरीसह पिके भुईसपाट झाली आहेत.
आंबे गळाले, झाडे पडली, विजेच्या तारा तुटल्या, ओढ्या नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके गाडली गेली. मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून पेरणीपूर्व मशागतींना सुरुवात होणार आहे. खेडच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटाने अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. सायंकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली व वाऱ्याच्या वेगाबरोबरच पावसाने दमदारपणे बरसण्यास सुरुवात केली.
ढगफुटी सदृष्य झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामातील बाजरीची पिकेही भुईसपाट झाली अनेक शेतकऱ्यांनी शेतात साठवलेले कांदे भिजल्याने खराब होणार आहेत. चास, कमान, आखरवाडी येथील ओढ्या नाल्यांना पूर आले. चास येथे ओढ्याच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने सुभाष रासकर यांचे उन्हाळी भुईमुगाचे पीक गाडले गेले तर नितीन रासकर, मनोज रासकर यांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.
तारा तुटून वीजपुरवठा खंडित
आखरवाडी, चास येथे झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर पडल्याने विजेचा तारा तुटून कित्येक तास वीजपुरवठा खंडित झाला. कमान येथे ओढ्याच्या पुरात साठवलेली वैरण वाहून गेली. सुमारे पाऊण तास झालेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन खरिपांच्या पेरमीपूर्व मशागतींना वेग येणार आहे.
03370