Buddha Purnima 2025: गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला गणिकेकडे का पाठवलं होतं? वाचा बुद्धांच्या निर्णयामागची प्रेरणादायी कथा
esakal May 12, 2025 05:45 PM

Teachings of Buddha Through Real-Life Examples: दरवर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाते. गौतम बुद्धांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी प्रसंगांनी भरलेले आहे. आणि हे प्रसंग आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यापैकीच एक म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांच्या एका शिष्याला गणिकेच्या आमंत्रणावर तिच्या घरी राहण्यासाठी परवानगी दिली. या गोष्टीमागे एक महत्त्वाची शिकवण दडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया ही संपूर्ण घटना.

मॉन्सूनमधील स्थिरता आणि भिक्षुंचा नियम

गौतम बुद्ध हे नेहेमी आपल्या शिष्यांसोबत सतत प्रवास करत असत. तसेच त्यांनी एक नियम केला होता की पावसाळ्यात भिक्षूंनी दीड-दोन महिने एकाच ठिकाणी थांबावं, कारण त्या दिवसांत जंगलाचे रस्ते खूप खराब आणि धोकादायक असत. बाकी वेळेला भिक्षूंनी दोन दिवसांपेक्षा जास्त कुठेही थांबण्याची परवानगी नव्हती , जेणेकरून कोणत्याही कुटुंबावर त्यांचं ओझं पडू नये.

गणिकेचे आमंत्रण

असेच एकदा एका गावी मुक्कामासाठी आल्यावर गौतम बुद्धांचा शिष्य आनंद याला एका गणिकेने तिच्या घरी राहण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती. आनंदने तिला नम्रपणे उत्तर दिलं, "मी येईन, पण आधी माझ्या गुरूंची म्हणजेच बुद्धांची परवानगी घेणं आवश्यक आहे." तेव्हा ती स्त्री म्हणाली, "तुला खरंच परवानगी घ्यावी लागेल?" आनंद हसत म्हणाला, "बुद्ध माझा निर्णय नक्कीच मान्य करतील, पण त्यांना विचारणं हा आमचा शिष्टाचार आहे."

बुद्धांची परवानगी आणि शिष्यांचा विरोध

आनंदने हा प्रसंग बुद्धांना सांगितला आणि त्यांची परवानगी मागितली. बुद्ध सौम्यपणे हसले आणि म्हणाले, "जर ती स्त्री तुला इतक्या प्रेमाने आमंत्रण देत आहे, तर ते नाकारणं योग्य ठरणार नाही. जा, आणि तिच्या घरी राहा."

बुद्धांचा हा निर्णय इतर शिष्यांना खटकला. त्यांनी आश्चर्याने विचारलं, "एक भिक्षू गणिकेच्या घरी राहील हे योग्य कसं?" तेव्हा बुद्ध म्हणाले, "तीन दिवस थांबा. तुमचं उत्तर मिळेल." शिष्य गोंधळले, पण शांत राहिले.

इतर शिष्यांच्या कल्पना व शंका

त्या रात्री गणिकेच्या घरातून आनंद आणि त्या स्त्रीच्या गाण्याचा आवाज येऊ लागला. शिष्यांमध्ये कुजबुज सुरू झाली—"आनंद तर वाटच चुकला!" दुसऱ्या दिवशी गाण्यासोबत नाचाचे तालही ऐकू आले. आता बहुतेकांनी ठरवून टाकलं की आनंद परत येणारच नाही. तिसऱ्या दिवशी काही शिष्यांनी खिडकीतून त्यांना एकत्र नाचताना पाहिलं. आता तर सगळ्यांनाच खात्री झाली की आनंद भिक्षूंना सोडून त्या स्त्रीसोबतच राहणार.

आश्चर्यकारक शेवट

पुढच्या दिवशी सर्व शिष्य चौकात गोळा झाले. कुणालाही आनंदच्या परतीची आशा नव्हती. पण थोड्याच वेळात आनंद आला… आणि त्याच्यासोबत होती तीच स्त्री, ती आता एक भिक्षुणी बनली होती!

सर्व जण आश्चर्यचकित झाले. बुद्ध हसत तिचं स्वागत करत होते. आनंदच्या खांद्यावर हात ठेवत बुद्ध म्हणाले, "जर तुमचा आत्मविश्वास खंबीर असेल, तर तुम्हाला कोेणीही भ्रष्ट करू शकत नाही. उलट, तुम्ही इतरांना सद्गुणी बनवू शकता."

ही कथा आपल्याला शिकवते की बाह्य रूप पाहून कुणावरही शंका घेऊ नये. आपलं मन स्वच्छ आणि उद्दिष्ट स्पष्ट असेल, तर कोणत्याही वाईट परिस्थितीत आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.