विराट कोहलीने 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दिला अचानक पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर सहा दिवसात विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. टी20 वर्ल्डकप 2024 नंतर असंच चित्र पाहायला मिळालं होतं. विराट कोहलीने जेतेपदानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पण विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण काय? कसोटी क्रिकेट विराट कोहलीच्या हृदयाजवळ होतं. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विराट कोहली 123 कसोटी सामन्यात 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यात विराट कोहलीने 30 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच सातवेळा द्विशतक ठोकण्याचा विक्रमक केला आहे. इतकंच काय तर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 40हून अधिक कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात विराट कोहलीने नेमका असा निर्णय का घेतला असावा?
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्यापूर्वी बीसीसीआयवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर एक वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यात संघाचं कर्णधारपद भूषवू इच्छित आहे, अशी बातमी पसरली होती. पण बीसीसीआयने यासाठी स्पष्ट नकार दिला होता. हा खेळाडू विराट कोहली तर नव्हता ना? कारण रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटला रामराम ठोकेल अशी काहीच चर्चा नव्हती. पण त्याने अचानकपणे कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. विराट कोहलीने नाराज होत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विराट कोहली दीर्घ काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे. मागच्या वर्षी 10 कसोटी सामन्यात त्याने 24.52 च्या सरासरीने 417 धावा केल्या. मागच्या पाच वर्षात फक्त 2023 हे वर्ष विराट कोहलीला चांगलं गेलं. या वर्षात त्याने 50हून अधिक सरासरीने धावा केल्या. पण 2020 मध्ये त्याची सरासरी 19.33, 2021 मध्ये 28.21 आणि 2022 मध्ये त्याची सरासरी 26.50 होती.
विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा खूपच वाईट गेला. त्याने पाच कसोटी सामन्यात फक्त 190 धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी फक्त 23.75 इतकी होती. यातही पहिल्या कसोटी सामन्यात शतक आलं होतं. यावरून विराट कोहलीने इतर चार सामन्यात काय कामगिरी केली हे लक्षात येतं. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं सहाजिकच होतं. त्यामुळे त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव वाढला होता.