Guwahati Case: गुवाहाटीत पोलिसांनी आढळली सूटकेस... उघडताच समोर आले भयंकर सत्य, आई अन् प्रियकर ताब्यात
esakal May 12, 2025 11:45 PM

एका १० वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचे अवशेष सूटकेसमध्ये सापडल्याने संपूर्ण गुवाहाटी बासिष्ठा परिसरात खळबळ उडाली आहे. या अमानुष घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलीस तपासानुसार, मुलाची हत्या त्याच्या स्वत:च्या आईने आणि तिच्या प्रियकराने केली असून, मृतदेह एका ट्रॉली बॅगेत भरून बासिष्ठ मंदिराजवळील झाडझुडपात फेकून दिला होता.

पोलिसांनी उघड केला कट

गुवाहाटी (ईस्ट) विभागाचे उपायुक्त मृणाल डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मुलाची आई दीपाली राजबोंगशी आणि तिचा प्रियकर ज्योतिर्मय हालोई यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, हालोईने पोलिसांना मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी नेले.

आईने दाखल केली होती मिसिंग रिपोर्ट, पण वागणुकीवरून संशय

शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्याच दिवशी आईने डिसपूर पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याचा रिपोर्ट दाखल केला होता. तिच्या वागणुकीवरून पोलिसांना संशय आल्यामुळे सखोल चौकशी सुरू करण्यात आली. त्यातूनच गुन्ह्याचे धक्कादायक स्वरूप समोर आले.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी मृत मुलाचा शालेय दप्तरही आढळले. एका कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. सीआयडी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून, ठिकाणाहून अनेक नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले गेले आहेत.

पोस्टमार्टम अहवाल महत्त्वाचा ठरणार

पोस्टमॉर्टेम सोमवारी होणार असून, त्यामधून मृत्यूचे नेमके कारण, वेळ आणि हत्या कशा पद्धतीने झाली हे स्पष्ट होणार आहे. यामुळे तपासाला अधिक दिशा मिळेल अशी पोलिसांची अपेक्षा आहे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका आईनेच आपल्या मुलाचा खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण समाज हादरला आहे.

अंतिम निष्कर्षासाठी तपास सुरूच

पोलिस उपायुक्त डेकांनी सांगितले की, "राजबोंगशी आणि हालोई यांच्याकडून गुन्ह्यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक माहिती पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर समोर येईल."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.