LIVE : 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे - भारतीय हवाई दल
BBC Marathi May 11, 2025 07:45 PM
ANI ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामं अचूकपणे पार पाडल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शनिवारी (10 मे) संध्याकाळी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला गेला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचा आरोप भारतानं केलाय. वाचा.

आज दिवसभरातील अपडेट इथे वाचा :

BBC

भारतीय हवाई दलानं X या समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटलंय की, त्यांचं ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि वेळ आल्यावर अधिक माहिती दिली जाईल.

रविवारी (11 मे) दुपारी , "भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामं अचूक आणि व्यावसायिकपणे पार पाडली. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार ही कामं विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पद्धतीनं पार पाडण्यात आली.

"ऑपरेशन अजूनही सुरू आहे, त्यामुळे अधिक माहिती नंतर दिली जाईल. चुकीच्या आणि प्रमाणित नसलेल्या माहितीचा प्रसार टाळावा, असं आवाहन भारतीय हवाई दल सर्वांना करत आहे."

पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने 6-7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले होते, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता.

यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याबद्दल माहिती दिली.

शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारत-पाकिस्तानचं कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (11 मे) शस्त्रसंधीबद्दल भारत आणि पाकिस्तानचं कौतुक केलं.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एका पोस्टमध्ये म्हटलं की, "मला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. त्यांनी योग्य वेळी शहाणपण आणि धैर्य दाखवत हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला, कारण या संघर्षामुळे लाखो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असता आणि मोठे नुकसान होऊ शकले असते."

Getty Images डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प पुढे म्हणाले,"मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली."

भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार वाढवण्याबद्दलही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये उल्लेख केला.

यासोबतच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानसोबत मिळून काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबतही म्हटलं.

भारत-पाकिस्तान संघर्ष आणि 1971 मधील युद्धाच्या तुलनेवर शशी थरूर काय म्हणाले?

केरळमधील तिरुअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

ते म्हणाले, "मला वाटतं की 1971चं युद्ध आपल्या इतिहासातील एक मोठी कामगिरी होती आणि एक भारतीय म्हणून मला त्याचा अभिमान आहे. इंदिरा गांधींनी उपखंडाचा नकाशा बदलला होता. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आज पाकिस्तानची परिस्थिती वेगळी आहे. त्यांची लष्करी शस्त्रे, त्यांच्यामुळे होणारे नुकसान, सर्वकाही वेगळे आहे."

शशी थरूर म्हणाले की, 1971च्या युद्धाचं उद्दिष्ट बांगलादेशला मुक्त करणं हे होतं.

Getty Images शशी थरूर '...तोपर्यंत शाश्वत शांतता अशक्य'

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या एक्स अकाउंटवर त्यांनी लिहिले आहे, "जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारताविरुद्ध दहशतवादासाठी करत राहील, तोपर्यंत शाश्वत शांतता शक्य नाही."

"शस्त्रसंधी होवो किंवा न होवो, आपण पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग थांबवू नये. जेव्हा जेव्हा बाहेरून आक्रमण झाले आहे, तेव्हा मी सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. हे समर्थन कायम राहील," असं ओवैसी म्हणाले.

ANI असदुद्दीन ओवैसी

ओवैसी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे कौतुक केले आणि या संघर्षात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तसंच, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शस्त्रसंधीची घोषणा ट्रम्प यांच्या वतीने झाल्याबद्दल भारत सरकारला प्रश्न विचारला.

अमृतसरमध्ये अजूनही रेड अलर्ट

पंजाबमधील अमृतसरमध्ये रात्री उशिरा सायरनचे आवाज ऐकायला मिळाले. त्यानंतर उपायुक्त साक्षी साहनी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांच्या माहितीनुसार, सध्या अमृतसरमध्ये वीज सेवा पूर्ववत करण्यात आली आहे, पण जिल्हा अद्याप रेड अलर्टवर आहे.

साक्षी साहनी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या घरातच राहावं आणि खिडक्यांपासून दूर रहावं.

"जेव्हा परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईल, तेव्हाच प्रशासनाकडून हिरवा सिग्नल दिला जाईल. कृपया घाबरू नका, शांतता राखा आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करा," असंही त्या म्हणाल्या.

Getty Images

भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केलं.

त्यानंतर काही वेळानं पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीचं अनेकवेळा उल्लंघन झाल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं.

शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन - भारत

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यात मिस्री यांनी म्हटलं, "भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही तासांपूर्वी शस्त्रसंधी झाली होती, पण त्याचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलाकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि याला पाकिस्तान जबाबदार आहे."

मिस्री पुढे म्हणाले, "पाकिस्तानने सद्यपरिस्थिती समजून घ्यावी आणि अशी घुसखोरी ताबडतोब थांबवावी.सैन्याला अशा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आहे. तसंच, पाकिस्तानने असं उल्लंघन टाळावं आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं."

MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS, YOU TUBE भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

त्याआधी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटलं होतं की, "शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं. संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत."

हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय - शरीफ

मध्यरात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाला उद्देशून भाषण केलं.

"कोणी स्वातंत्र्याला आव्हान दिलं तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी काहीही करू," असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.

EPA/PTV पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तानवर विनाकारण आरोप केले जात असून, त्याची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तावर ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात मशिदींचं नुकसान झालं असून निरपराध लोक मारले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करानं याचा कसा सामना केला याबाबतही माहिती दिली. "आपल्या मूल्यांचं रक्षण करण्यात देश यशस्वी झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानी यशस्वी झाले आहे, आपण जिंकलो आहोत. हा विजय आहे," असं ते म्हणाले.

हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणत शरीफ यांनी कौतुक केलं. त्यांनी पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांचं अभिनंदन केलं. देशातील विरोधी पक्षांचेही शरीफ यांनी आभार मानले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.