कनकविरा नदीला जीवदान
esakal May 11, 2025 08:45 PM

टोकावडे, ता. ११ (बातमीदार)ः सह्याद्री पर्वतरांगेतील नागझिरा येथे उगम पावून काळू नदीला मिळणाऱ्या कनकविरा नदीच्या संवर्धनासाठी गेली नऊ वर्षे लोकसहभागातून मोहीम राबवली होती. या प्रयत्त्नांना चांगले यश आले असून, नदीला जीवदान मिळाले आहे.
मुरबाड तालुक्यातील १८ किलोमीटरचा लांबचा फेरा मारून वाहणाऱ्या कनकविरा नदीतील गाळ उपसा झाल्याने पात्र अरुंद आणि उथळ झाले होते. त्यामुळे पावसाळ्यात नदीत पूरजन्य परिस्थितीमुळे शेतांमध्ये पाणी जाण्याचे प्रमाण वाढले होते. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याच कारणास्तव २०१६ च्या सुमारास नदीतील गाळ उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी वसुंधरा संजीवनी मंडळाने खासगी संस्थांच्या अर्थसहाय्यातून ‘कनकविरा नदी पुनरुज्जीवन’ कार्यक्रमांतर्गत नदीपात्रातील ५० हजार घनमीटर गाळ काढला, तर २०१६ ते २०२४ दरम्यान पात्रातील असलेल्या १० छोट्या धरणांची दुरुस्ती करण्यात आली. परिणामी, नदीपात्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत.
---------------------------------------
शेतकऱ्यांना लाभ
राज्य सरकार, टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशन यांनी गाळ उपसा करण्यासाठी पोकलान उपलब्ध करून दिल्याने वसुंधरा संजीवनी मंडळाच्या पर्यवेक्षणाखाली दीड महिन्यांपासून नदीतील गाळ उपशाचे काम सुरू होते. नुकतेच नदीपात्राची खोली गाळ उपसा केल्याने वाढलेली असल्याने नदीच्या पुराचे पाणी बाजूच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळेल. या नदीवरील साठलेले पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊन दुबार-तिबार पिके घेऊ शकतील, पाणी झिरपून परिसरातील कूपनलिका आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढेल.
-----------------------------------------
वाघाचीवाडी येथील चेक डॅमच्यावर भागातील सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत अंदाजे ६१ हजार क्युबिक मीटरचा गाळ काढण्यात आला. त्यामुळे या नदीमध्ये यंदाच्या पावसाळ्यात १४ कोटी लिटर्स पाणीसाठे निर्माण होतील.
- मिलिंद केळकर, सदस्य, वसुंधरा संजीवनी मंडळ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.