Surendra Moga : पाकच्या हल्ल्यात जवान शहीद; वर्दी छातीला कवटाळून वीरपत्नी म्हणाली I Love You, प्लीज एकदा उठा
esakal May 12, 2025 03:45 AM

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यात शनिवारी जम्मू काश्मीरच्या उधमपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान सुरेंद्र कुमार मोगा हे शहीद झाले होते. त्यांच्यावर रविवारी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्नीसह त्यांच्या मुलीने केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. सुरेंद्र कुमार मोगा हे हवाई दलात मेडिकल असिस्टंट सार्जंट म्हणून कार्यरत होते.

सुरेंद्र कुमार हे शहीद झाल्याचं वृत्त कळताच पत्नी सीमा बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलगी वृतिका वडिलांचा मृतदेह पाहून बेशुद्ध पडली. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिनं संताप व्यक्त केला. तसंच वडिलांचा बदला मी घेईन. सगळा पाकिस्तान नष्ट व्हावा अशा शब्दात तिनं भावना व्यक्त केल्या. सुरेंद्र यांना मोठी मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा दक्ष ही दोन अपत्ये आहेत.

I Love You, फक्त एकदा उठा

झुंझुनूतील सुरेंद्र यांच्या मूळगावी त्यांचे पार्थीव पोहचताच गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील लोक अंत्यदर्शनासाठी आले होते. सुरेंद्र यांची पत्नी सीमा यांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. I Love You, उठा, फक्त एकदा उठा असं म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

सगळं आहे पण सुरेंद्र नाहीत

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सुरेंद्र यांची वर्दी आणि टोपी सीमा यांच्याकडे सोपवली. त्यावेळी सीमा यांनी वर्दी छातीला कवटाळत तीन वेळा आय लव्ह यू म्हटलं. अधिकारी सीमा यांना म्हणाले की, सगळं हवाई दल आणि पूर्ण देश तुमच्यासोबत आहे. त्यावेळी सुरेंद्र यांची पत्नी म्हणाल्या की, सगळं काही आहे पण माझे सुरेंद्र माझ्याजवळ नाहीत. मला सांगा सुरेंद्रना सोबत का आणलं नाहीत, त्यांना का सोडून आलात असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

घर बांधलं, गृहप्रवेश करून ड्युटीवर परतले

सुरेंद्र यांनी त्यांच्या गावी नवं घर बांधलं होतं. नव्या घरात गृहप्रवेश झाल्यानंतर १५ एप्रिलला ते ड्युटीवर परतले होते. निवृत्त झाल्यावर इतरांसारखं शहरात नाही तर आपल्या गावातच रहायचं त्यांचं स्वप्न होतं. सुरेंद्र यांचे पार्थिव पाहून आता या घरात कोण रहायचं असं म्हणत आईने आल्या भावना व्यक्त केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.