अकोल्यात नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. दोघांचंही वय १८ वर्षे आणि १७ वर्षे असं होतं. दोघांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलं नाहीय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोल्यात पार्थ गणेश नेमाडे या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आणि अर्णव नागेश देबाजे या १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पार्थ हा तेल्हारा तालुक्यातल्या रायखेड इथला होता. तो अकोल्यात न्यू अकॅडमी इथं क्लासला जात होता.
पार्थशिवाय अर्णव नावाच्या विद्यार्थ्यानंही आत्महत्या केलीय. तो मोठी उमरी भागातला रहिवासी होता. आत्महत्या केलेले दोन्ही विद्यार्थी नीट परीक्षेचा अभ्यास करत होते. परीक्षेआधी दोघांनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोल्यात खळबळ उडालीय.
अकोल्यातल्या पार्थनं घरात विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं. पार्थच्या कुटुंबियांनी ही बाब समजताच त्याला रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, अर्णबलाही त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात आणलं. पण त्याचाही मृत्यू झाला होता. दोन्ही विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलेलं नाहीय.
बीडधील नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानं लातूरमध्ये आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. अनिकेत कानगुडे असं विद्यार्थ्याचं नाव असून तो कोचिंग क्लासमध्ये परीक्षेची तयारी करत होता. गेल्या परीक्षेत ५२० गुण मिळूनही त्याला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नव्हता.