पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारताने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराने सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. मात्र दोन्ही देशांनी आता शस्त्रसंधी केलीय. पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीनंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. यात भारतीय नौदलाच्या व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांना विचारण्यात आलं होतं की, पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर काय? यावर एएन प्रमोद यांनी पाकिस्तानला आता समजलंय की भारत काय करू शकतो असं उत्तर दिलं.
एएन प्रमोद म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरवेळी आम्ही अशा ठिकाणांना टार्गेट करण्याची तयारी ठेवली होती जिथं गरज पडल्यास हल्ला केला जाऊ शकेल. यात कराचीचासुद्धा समावेश होता. भारतीय नौदल अजूनही समुद्रात संपूर्ण ताकदीनिशी सज्ज आहे. कोणत्याही शत्रूच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचंही एएन प्रमोद यांनी सांगितलं.
आता जर पाकिस्तानने पुन्हा हल्ल्याचं धाडस केलं तर काय? असं विचारलं असता एएन प्रमोद म्हणाले की, पाकिस्तानने आता जर काही कारवाई करण्याचं धाडस केलंच तर पाकिस्तानला चांगलंच माहितीय की भारत आता काय करू शकतो.
भारताच्या नौदलाचे डायरेक्टर जनरल नेवल ऑपरेशन्स व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी सांगितलं की, पहलगाम हल्ल्यानतंर भारतीय नौदलाच्या कॅरीअर बॅटल ग्रुप, लष्कराचे युनिट्स, पाणबुड्या आणि हवाई दल युद्धाच्या तयारीसह समुद्रात तैनात केले होते. दहशथवादी हल्ल्याच्या ९६ तासांच्या आत अरबी समुद्रात अनेक शस्त्रांच्या चाचण्यांसह आम्ही रणनिती आणि इतर प्रक्रियेची चाचणी घेतली आणि सज्ज झालो. भारतीय नौदलाच्या ताकदीसमोर त्यांचे नौदल आणि हवाईदल हालचाल करू शकले नाही. ते फक्त बंदर आणि किनारपट्टी भागातच राहिले. त्यांच्यावर सातत्यानं आमची करडी नजर होती.