भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच शेअर मार्केटमध्ये आनंदाला भरती! सेन्सेक्सची 2200 अंकांनी उसळी
Marathi May 12, 2025 01:25 PM

भारत पाकिस्तान युद्धाचा शेअर बाजार: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर भडकलेले युद्ध शनिवारी थांबले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची हॉटलाईनवरुन चर्चा झाल्यानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारत-पाक युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेले मंदीचे ढग हवेतच विरले होते. याचे सकारात्मक पडसाद सोमवारी भांडवली बाजारात पाहायला मिळाले.

भांडवली बाजारात सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. आज सकाळी बाजार उघडतात सेन्सेक्सने तब्बल 2200 अंकांची उसळी घेतली. त्यामुळे आता सेन्सेक्सने 81 हजारांची पातळी ओलांडली आहे. तर निफ्टीही वधारताना दिसला. निफ्टी 50 निर्देशांकाने 700 अंकांची उसळी घेतली असून त्याने 24 हजार 600 चा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या आयात कर धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण पाहायला मिळाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली होती. यामधून शेअर बाजार सावरत नाही तोच भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे चिंतेचे ढग दाटले होते. या सगळ्यामुळे भारतीय गुंतवणूकदार काहीसे धास्तावले होते.  मात्र, आता शस्त्रसंधी झाल्याने युद्धाचा तणाव निवळला आहे. त्यामुळे शेअर बाजाराची घोडदौड पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सुरु झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे सोन्याच्या दरातही चढउतार पाहायला मिळत आहेत. शस्त्रसंधी झाल्यामुळे सोन्याचे दर पुन्हा खाली येताना दिसत आहेत.

सविस्तर माहिती अपडेट होत आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.