तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : दिवसेंदिवस विजेच्या वाढत्या लपंडावामुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार गाव, गावठाणात अधिक वाढल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पावणे गावात दैनंदिन विजेची समस्या भेडसावत आहे. एकदा वीज गेल्यानंतर चार ते पाच तासांनंतरच वीजपुरवठा सुरळीत होतो. कधी डीपी बॉक्सला आग लागते; तर कधी मुख्य वीजवाहिन्या नादुरुस्त होत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. कधी एमआयडीसीमध्ये बिघाड झाला असल्याचे कारण सांगितले जाते. सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील वीज एकदा गेल्यानंतर थेट सात ते आठ तासांनीच सुरळीत होते. पावणे गावात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीज गेली होती, ती पहाटे चारच्या सुमारास आली. पुन्हा सकाळी गेली ती थेट सायंकाळी आली. त्यानंतर ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला, तो रात्री सुरू झाला. असा प्रकार वारंवार होत असल्याने रात्रभर उकाड्यात जागरण करण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली आहे.
-------------
पिण्याचे पाणीही मिळणे मुश्कील
पावणे गावासह तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली या दोन्ही नोडमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल व मे महिन्यापासून ही समस्या अधिकच वाढली आहे. एकीकडे असह्य करणारा उकाडा; तर दुसरीकडे वीज सारखी गायब होत असल्यामुळे विजेवर आधारित असणाऱ्या उपकरणांचा वापरच होत नाही. अवेळी वीजसमस्या उद्भवत असल्याने अनेकांना पाणीदेखील मिळत नाही. सध्या पाणीपुरवठा मोटारीवर आधारित असल्याने वीज असली तरच पाणी मिळते; मात्र ज्या वेळी वीज जाते त्या वेळी पाणीच मिळत नाही.