दिलासादायक! 48 तासात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण, सध्या सोन्याचा दर काय?
Marathi May 12, 2025 03:25 PM

सोन्याची किंमत: सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी क दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत पाकिस्तानमध्ये (India Pakistan) शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याच्या दरात दोन दिवसात 2 हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होताच सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ झाली होती. सोन्याच्या दरानं लाखाच्या पुढचा टप्पा गाठला होता. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. मात्र, अशातच आता सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

जीएसटीसह सोन्यचा दर हा 97540 रुपयांवर

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण होताच सोन्याच्या दरात साडेतीन हजार रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटीसह लाखाच्या वर जाऊन पोहोचले होते.
मात्र, भारत पाक शस्त्रसंधी जाहीर होताच सोन्याच्या दरात गेल्या 48 तासात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर हे जीएसटी शिवाय 94700 तर जीएसटीसह हेच दर 97540 वर खाली घसरले आहेत. अजूनही दर खाली येण्याचा अंदाज सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने आनंद झाला आहे. मात्र अजूनही दर कमी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

सोन्याच्या दरात चढ उतार

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठी चढउतार दिसत आहे. आधीच सोनं लाखाच्या घरात गेल्यानं सोन्याच्या खरेदीबाबत साशंक असलेल्या ग्राहकांना आता भारत पाकिस्तानातील तणावामुळे पुन्हा वाट पाहण्याचीच वेळ आल्याचं चित्र आहे. गेल्या आठवड्यात 1लाख 500 रुपये प्रति तोळे असणारे सोन्याच्या दरात आता मोठी घसरण झालीय.  सीमेवर भारत-पाक तणावाचा परिणाम दिसून आला आणि सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. आता युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आलीय. सध्याच्या स्थितीत सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने सोन्याचे दर अजून कमी होतील, असे काही ग्राहकांना वाटत आहे. तर, काही ग्राहकांना सोन्याचे दर अजून वाढतील अशी अपेक्षा असल्याने खरेदी करावी किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचे सोने व्यावसायिक सांगत आहेत. वाढलेले सोन्याचे दर हे सर्व सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरचे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावी किंवा नाही हे कळत नाही. सोने खरेदीबाबत संभ्रमावस्था असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

India Pakistan War Gold Rate : भारत-पाक तणावाचा सुवर्ण बाजारावर परिणाम; सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार, ग्राहक संभ्रमात, आज किती रुपयांची घसरण?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.