Pakistan Stock Markets: भारतासोबत युद्धबंदीच्या घोषणेनंतर, आज 12 मे रोजी पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कराची शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक, केएसई-30, 9% ने वाढला, ज्यामुळे व्यवहार एका तासासाठी थांबवावे लागले.
केएसई-100 निर्देशांकही व्यवहारादरम्यान जवळपास 9% किंवा 9,928 अंकांनी वाढून 117,104.11 अंकांच्या पातळीवर पोहोचला आणि त्यातील व्यवहारही एका तासासाठी थांबवण्यात आले. भारत आणि युद्धबंदी करार आणि आयएमएफने पाकिस्तानला दिलेल्या 2.3 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजनंतर ही तेजी दिसून आली आहे.
अलिकडच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता, परंतु दोन्ही देशांमधील युद्धबंदी झाल्यानंतर शेअर बाजार पुन्हा तेजीत आला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 9 मे रोजी पाकिस्तानसाठी बेलआउट पॅकेजला मंजुरी दिली.
दरम्यान, युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अनुक्रमे सुमारे 2.5 टक्क्यांनी वाढून 81,689.46 आणि 24,700.05 वर पोहोचले. लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे शेअर्सही वधारले. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 3.5% वाढला, तर मिडकॅप निर्देशांक 3.1% वाढला.
'शेअर बाजारातील भीतीचा निर्देशांक' म्हणून ओळखला जाणारा अस्थिरता निर्देशांक (VIX Index) देखील आठ दिवसांच्या सतत वाढीनंतर आज 12 मे रोजी खाली आला, जो गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारा होता.
यापूर्वी, 8 मे रोजी पाकिस्तान शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. केएसई-30 निर्देशांक 7.2% घसरल्यानंतर व्यवहार तात्पुरता थांबवावा लागला. गेल्या वर्षी, पाकिस्तानच्या शेअर बाजाराने 22 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले. गेल्या एका वर्षात केएसई-30 निर्देशांक 33% पेक्षा जास्त वाढला आहे.
सध्या, कराची स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवल फक्त 20.36 अब्ज डॉलर आहे, तर शेअर बाजाराचे मूल्यांकन 5 ट्रिलियन डॉलर आहे आणि तो जगातील टॉप-5 शेअर बाजारांपैकी एक आहे. भारतात 5,000 हून अधिक कंपन्या लिस्ट आहेत, तर पाकिस्तानमध्ये ही संख्या 500 पेक्षा कमी आहे.