भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
अपोलो हॉस्पिटल्स आणि दिल्ली सरकार यांच्या संयुक्त उपक्रमाने १९८८ मध्ये स्थापन झालेली इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन ही कंपनी दिल्ली येथील सरिता विहार येथे ७१८ खाटांचे आणि नॉयडा येथे ४६ खाटांचे अशी दोन रुग्णालये चालवते. एकंदरीत बारा प्रकारच्या आरोग्यसेवा पुरवणारे ही सुपर स्पेशॅलिटी रुग्णालये आहेत. अपोलो हॉस्पिटल्स कंपनी आणि ही कंपनी या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत; पण त्यांच्यात आपसात सहकार्य आहे आणि व्यवस्थापनात अपोलो हॉस्पिटल्सचेच लोक आहेत.
उत्तर भारतात रोबोटिक कार्डियाक शस्त्रक्रिया करणारे हे पहिले आणि एकमेव रुग्णालय आहे. येत्या तीन वर्षांमध्ये ५५० कोटी रुपये खर्चून सरिता विहार येथील रुग्णालयात आणखी ३५० खाटा उपलब्ध करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी लागणारा खर्च प्रथम कंपनीच्या शिलकीतून केला जाईल आणि नंतर लागल्यास कर्ज घेतले जाईल. कंपनीच्या ताळेबंदावर सध्या ३०९ कोटी रोख शिल्लक दिसते आहे. सामान्यतः विस्तार करताना जागा उपलब्ध असेल, तर विद्यमान रुग्णालयाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतात कारण नवीन जागी रुग्णालय बांधण्यासाठी जास्त खर्च येतो आणि ते फायद्यात येण्यासाठी सहा ते सात वर्षे लागू शकतात. विद्यमान रुग्णालयात उपलब्ध सोयींचा फायदा मिळतो आणि गुंतवणुकीवरचा परतावा तीन वर्षांमध्ये मिळू शकतो.
आर्थिक आकडेवारीकंपनीचे बाजारमूल्य जवळजवळ ३४७२ कोटी रुपये असून, कंपनीचा महसूल आणि निव्वळ नफा गेल्या पाच वर्षांमध्ये अनुक्रमे १० टक्के आणि ३४ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. कंपनीचे कर्ज नगण्य आहे. या वर्षीचा आरओसीई ३८ टक्के म्हणजे उत्तम आहे. कंपनीचा ताळेबंद ८०६ कोटी रुपयांचा असून खेळत्या भांडवलाची गरज अतिशय कमी आहे. कंपनीची पाच वर्षांची सरासरी रोकड आवक कार्यचालन नफ्याच्या तुलनेत ९५ टक्के आहे, जी अतिउत्तम आहे. २०२२ नंतर कंपनीचे मार्जिन १० टक्क्यांवरून वाढून १७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कंपनीचा ‘एआरपीओबी’ म्हणजे रुग्ण असलेल्या प्रत्येक खाटेमागचे सरासरी दैनिक उत्पन्न सुमारे ६८ हजार रुपये आहे, जे मॅक्स हॉस्पिटल्स वगळता इतर मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत जास्त आहे आणि त्यामुळे कंपनीचा नफा उत्तम आहे.
मूल्यांकनकंपनीचा शेअर सध्या २३ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे, जे १५.२ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा बरेच जास्त आहे. वाढीव मार्जिन लक्षात घेता हे मूल्यांकन फार जास्त नाही. पीईजी ०.६८ असून, निव्वळ नफावाढीच्या दृष्टीने मूल्यांकन वाजवी आहे. या कंपन्यांसाठी ईव्ही/ईबिटा गुणोत्तर हे विशेष महत्वाचे असते आणि ते जितके कमी तितके उत्तम. या कंपनीचे हे गुणोत्तर १२.६ आहे, जे बाकी कंपन्यांपेक्षा खूप कमी आहे. नफावृद्धीच्या तुलनेत अपोलो, मॅक्स, फॉर्टिस आणि नारायण हृदयालय या कंपन्या इंद्रप्रस्थ पेक्षा चांगल्या आहेत; पण त्या बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत आणि त्यांचे मूल्यांकन फार जास्त आहे.
निष्कर्ष२०२४च्या आकड्यांप्रमाणे भारताच्या ‘जीडीपी’च्या १.९ टक्के वाटा आरोग्यसेवांवर खर्च होतो. आरोग्यविम्यांची २०२४ची रक्कम १.०९ लाख कोटी किंवा एकूण सर्व विम्यांच्या ३८ टक्के होती. मेडिकल टूरिझम म्हणजे उपचारांसाठी भारतात येणाऱ्या परदेशी लोकांचा वाढता ओघ आहे आणि सध्या हे मार्केट ६५ हजार कोटी रुपयांचे आहे. येत्या पाच वर्षांत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. एकूण बघता भारतातील व्यावसायिक रुग्णालयांसाठी व्यवसायवाढीची उत्तम संधी आहे आणि म्हणून ही कंपनी गुंतवणुकीसाठी अभ्यासनीय आहे.
(डिस्क्लेमर ः हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)