यूटीआय मल्टी कॅप फंड
esakal May 12, 2025 03:45 PM

वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

यूटीआय म्युच्युअल फंडाने त्यांचा यूटीआय मल्टी कॅप फंड गुंतवणुकीस २९ एप्रिल रोजी खुला केला असून, तो १३ मार्चपर्यंत खुला असेल. ‘सेबी’च्या मल्टी कॅप फंडाच्या व्याख्येनुसार या फंडाच्या एकूण मालमत्तेच्या प्रत्येकी २५ टक्के मालमत्ता लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करणे अनिवार्य असून, उर्वरित २५ टक्के निधी व्यवस्थापकाच्या मर्जीनुसार गुंतवणूक करण्याची मुभा आहे. हा एक ओपन-एंडेड फंड असून, ‘निफ्टी ५०० मल्टी कॅप ५०:२५:२५’ हा फंडाचा बेंचमार्क आहे. कार्तिकराज लक्ष्मणन हे या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत.

त्यांना १७ वर्षांचा अनुभव असून, जुलै २०२२ मध्ये यूटीआय म्युच्युअल फंडात येण्याआधी ते बडोदा बीएनपी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय बँक आणि गोल्डमन सॅक्समध्ये कार्यरत होते. हा फंड रेग्युलर आणि डायरेक्ट अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध असून, एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान गुंतवणूक १००० रुपये, तर ‘एसआयपी’साठी किमान गुंतवणूक ५०० रुपये आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे युनिट वाटपाच्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत (सर्वसाधारणपणे हा कालावधी एक वर्षाचा असतो) रिडीम किंवा स्विच केले, तर एक टक्के ‘एक्झिट लोड’ आकारला जाईल. तथापि, वाटपाच्या तारखेपासून ९० दिवसांनंतर युनिट रिडीम केल्यास कहीही ‘एक्झिट लोड’ आकारला जाणार नाही.

मल्टी कॅप फंड सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी साजेसा फंड प्रकार आहे. एक फंड प्रकार म्हणून मल्टी-कॅप फंड हा तुलनेने नवा आहे. ‘सेबी’ने सप्टेंबर २०२० मध्ये बाजार भांडवलावर आधारित गुंतवणूक प्रमाणाचे नियम जाहीर केले. जानेवारी २०२१ च्या सुरुवातीला काही आधीपासून अस्तित्वात असलेले फंड त्या त्या फंड घराण्यांनी (निप्पॉन इंडिया, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, सुंदरम आणि इन्व्हेस्को) नव्या फंड गटात संक्रमित केले. या गटातील बहुतेक फंडांनी जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी सर्वाधिक पसंती लार्ज कॅप कंपन्यांना दिली आहे.

यूटीआय मल्टी कॅप फंड त्याचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ‘बॉटम अप’ रणनीतीचा वापर करेल. या फंड गटातील फंडात कधीही ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकते. या फंड गटाला (फंडांना नव्हे) फक्त चार-पाच वर्षांचा इतिहास आहे. मध्यम जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी फ्लेक्सी कॅप फंड हा चांगला पर्याय आहे, तर त्याहून अधिक अॅग्रेसिव्ह गुंतवणूकदारांसाठी मल्टी कॅप फंड हा चांगला पर्याय आहे. तथापि, याबाबत शंका असल्यास गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा’, असे फंडाच्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.