फ्रॉम द डेस्क ऑफ- युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका,
१६००, पेनसिल्वेनिया अवेन्यू, एन.डब्ल्यू., वॉशिंग्टन, डीसी २०५००
मा य डिअर फ्रेंड नारिंड्राभाई, हौ आर यु? मी सांगितले म्हणून तुम्ही पाकिस्तानचा बँड वाजवण्याची मोहीम थांबवलीत, याबद्दल थँक्यू! मी एकदम अमनपसंद आदमी आहे. माणसाने मौजमजा करावी, मजेत राहावे. युद्धाने कोणाचे भले होते? ‘कमॉन बडी, स्टॉप इट ॲट वन्स!’ असे मी म्हटले काय, आणि ‘केवळ तमारीमाटे हं डोलांडभाय’ असे म्हणत तुम्हीही तुमची मिसाइल्स ताबडतोब थांबवली काय, सगळेच स्वप्नवत आहे. मला आपल्या दोस्तीचा विलक्षण अभिमान वाटतो.
‘ये डोसटी, हाम नाही टोडेंगे, टोडेंगे डॅम मगर, टेरा सॅथ ना छाऊडेंगे’ हे फेमस साँग गात गातच मी आंघोळ केली. तुमच्या मेलानियाभाभीने न्हाणीघराचे दार वाजवून ‘आधी हे भयंकर गाणं म्हणणं बंद करा, नाहीतर तेवढ्यावरुन पुन्हा युद्ध सुरु होईल’ अशी धमकी (आणि टॉवेल) दिल्याने थांबलो. माझा आवाज तितकासा बरा नाही, हे मला मान्य आहे. पण न्हाणीघरात गाणे म्हणायलासद्धा बंदी का? ही एकप्रकारची लादलेली युद्धबंदीच आहे. असो.
तुम्ही माझे ऐकलेत याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे. माझे कुणीच ऐकत नसताना, तुम्ही कसे ऐकले? घरातसुद्धा माझे कोणी ऐकत नाही. कालच मी तुमच्या मेलानियाभाभीला जरा ढोकळा कर अशी फर्माईश केली, तर तिने थंडपणाने ‘घरातलं बेसनपीठ उडालंय’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले. युक्रेनलाही मी युध्द थांबवायला सांगितले होते, पण ते झेलेन्स्कीने ऐकले नाही. पुतिनला सांगितले तर त्यांनी ‘होक्का? बरं बरं’ एवढेच उद्गार काढले आणि फिक्कन हसले! तुम्ही बरे माझे ऐकलेत. माझ्यामुळे एक युध्द टळू शकते, याचेच मला आश्चर्य वाटते आहे. तुम्ही जाम शूरवीर आहात, सीजफायर मान्य केल्याबद्दल मी तुम्हाला बक्षीस म्हणून काही गुंतवणूक देणार आहे.
वाट पहा! तुमचाच दोस्त. डोलांडतात्या.
जनाब शहबॅज शॅरीफ यांना, गुड मॉर्निग! सर्वप्रथम सांगून टाकतो, तुस्सी ग्रेट हो! जंग लडना ईझी होता है, जंग बंद करना अवघड होता है! पण माझ्याखातर तुम्ही जंग गुंडाळले. मी फक्त फोन केला. फोन उचलल्यावर मी काही बोलण्याच्या आधीच तुम्ही ‘ हो, हो, थांबवतो युध्द’ असे तुम्ही सांगून टाकलेत!
मला काही बोलायची गरजच पडली नाही! हाहा!! मी तुम्हाला जंग थांबवा असे सांगणार आहे, हे तुम्ही कसे ओळखले? मनकवडे आहात का? जणू फोनशीच बसला होता. माझा फोन वाजताक्षणी टुण्णकन उडी मारुन ‘सीजफायर, सीजफायर’ असे ओरडलात. हो ना? तुम्ही फोनवर म्हणालात की, ‘‘जनाब डोनाल्डमियां, अगर आप कहे तो तोपों को जंग लगने तक जंग नही करेंगे.’’ शाब्बाश! तुमच्याकडे असलेआऱली मेड इन चायना विमाने आणि ड्रोन-मिसाईले भारतात जाऊन पडली. ती अजून फुटलीच नाहीत. चायना माल असाच असतो, हे आता कळले ना? मागल्या एका दिवाळीत व्हाइट हौसच्या हिरवळीवर उडवण्यासाठी आम्ही चिनी फटाके आणले होते. एकही फटाका फुटला नाही, आणि भुईचक्र मात्र दाणकन फुटले!! त्यांची शस्त्रास्त्रेसुद्धा अशीच असतात, हे आता क़ळले.
माझे ऐकल्याबद्दल मी तुम्हाला बक्षीस देणार आहे. आधीचा कर्जाचा डोंगर उपसण्याच्या कामी फावडे घेण्यासाठी कर्जसुद्धा देईन. तारणबिरण काही नको. दोस्तीत कसले आले आहे तारण? बराय. असेच (नीट) वागत रहा. फोनशी बसून राहा! तुमचा. डोनाल्ड ट्रम्प (साहेब म्हणायचं!)