डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश, बक्षीस शेअर, शेअर विभाजन आणि भांडवलवृद्धी हे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे मुख्य फायदे समजले जातात. चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला हे सर्व फायदे आलटूनपालटून मिळू शकतात. मात्र, बजाज फायनान्स या कंपनीच्या भागधारकांना हे सर्व फायदे एकत्रितपणे मिळाले आहेत.
शेअर विभाजनशेअरचे विभाजन (स्प्लिट ऑफ शेअर्स) या प्रक्रियेमध्ये कंपनीच्या एका शेअरचे विभाजन अधिक शेअरमध्ये होते. उदा. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरचे दोन शेअरमध्ये विभाजन झाल्यास पाच रुपयांचे दोन शेअर तयार होतात. या शेअरचे बाजारमूल्यदेखील त्याच प्रमाणात कमी होत असल्याने या प्रक्रियेचा गुंतवणूकदारांना लगेच फायदा होत नसला, तरी बाजारातील शेअरची संख्या वाढल्याने आणि शेअरचा बाजारभाव आवाक्यात आल्यामुळे त्यातील उलाढाल वाढते, त्यामुळे भविष्यात शेअरचा बाजारभाव वाढण्यास मदत होते. बजाज फायनान्सच्या संचालक मंडळाने दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरचे दोन शेअरमध्ये विभाजन करण्याचा निणर्य घेतला आहे. त्यामुळे भागधारकांच्या शेअरची संख्या दुप्पट होणार आहे.
बक्षीस शेअरबजाज फायनान्सच्या संचालक मंडळाने शेअरच्या विभाजनासोबत बक्षीस शेअरचीही (बोनस शेअर) घोषणा केली आहे. या प्रक्रियेमध्ये भागधारकांना बक्षीस म्हणून कोणतेही मूल्य न देता मोफत बोनस शेअर मिळतो. कंपनीच्या संचित नफ्यातून (रिझर्व्ह अँड सरप्लस) असे बक्षीस शेअर दिले जातात. बजाज फायनान्सच्या भागधारकांना ४:१ या प्रमाणात बोनस शेअर मिळणार आहे. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे शेअर विभाजन आणि बक्षीस शेअर यांची अंमलबजावणी २७ जून २०२५ च्या दरम्यान होणार आहे.
अंतिम व अंतरिम लाभांशबजाज फायनान्सच्या संचालक मंडळाने भागधारकांना यावर्षी अंतिम लाभांश (फायनल डिव्हिडंड) व विशेष लाभांश (स्पेशल डिव्हिडंड) या दोन्हींचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. प्रतिशेअर १२ रुपये विशेष लाभांश २६ मेच्या दरम्यान, तर प्रतिशेअर ४४ रुपये वार्षिक लाभांश २८ जुलैच्या आसपास मिळेल, असे कंपनीने जाहीर केले आहे. या शेअरच्या सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत लाभांशाची रक्कम खूप कमी असल्याने यिल्ड खूप कमी आहे. मात्र, ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर कमी भावात घेऊन ठेवले असतील, त्यांना उत्तम फायदा मिळणार आहे.
भांडवलवृद्धीबजाज फायनान्सच्या शेअरने गुंतवणूकदारांच्या गुंतवलेल्या रकमेची म्हणजेच भांडवलाची प्रचंड वाढ करून दिली आहे. गेल्या दहा वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना सरासरी ३१ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. कंपनीच्या नफ्यामध्ये नियमितपणे होत असलेल्या वाढीचे हे प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल.
बजाज फायनान्सप्रमाणे शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्या गुंतवणूकदारांना वरील फायदे देऊ शकतात. त्यासाठी अभ्यास करून योग्य वेळी अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.