मोठी बातमी ! अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? शिंदे गटाच्या नेत्याचे संकेत काय?
GH News May 12, 2025 04:08 PM

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खुद्द शरद पवार गटातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीतील फूट ही कौटुंबिक फूट आहे. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं विधानच संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. संजय शिरसाट हे मीडियाशी संवाद साधत होते.

उबाठा गटाने दोन्ही काँग्रेससोबत केलेली युती चुकीची होती. हे आम्ही आधीच सांगत होतो आणि आता त्याचा प्रत्यय आता त्यांना येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले तुमच्या सोबत राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो. आता जसेजसे त्यांचं भविष्य अंधारमय होत चालले आहे तसे आता ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीमधील फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते, पण ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे. त्यांनी एकत्र येणे काही नवीन नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

ना घर का, ना घाट का…

काँग्रेस देखील उबाठा सोबत कुठे आहे? गेल्या चार महिन्यात काँग्रेससोबत यांची कोणती बैठक झाली? कधी यांनी त्यांना फोन केला किंवा त्यांनी यांना फोन केला? पुढील काळात उबाठा गटाला एकटंच चालावे लागणार आहे. आता एकटाच प्रवास त्यांना महागात पडणार आहे. ते हिंदुत्वाशी एकरूप राहिले नाही, महाविकास आघाडीत जाऊन देखील महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाही. त्यांची आता घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे, अशी टीका शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली आहे.

समीकरणे काय ठरतात…

अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत जातील की नाही माहित नाही. मी युतीबद्दल सांगत आहे. आम्हाला काय मिळणार हे आम्ही आता सांगू शकत नाही. त्यांचं एकत्र येणे हे दोघेही काहीतरी संकेत देत आहेत. शरद पवार आमच्या सोबत येतील की अजित पवार यांचा नेतृत्व करतील हे सगळे प्रश्न आहे. त्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करेल हा देखील एक प्रश्न आहे, असं सांगतानाच दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येऊ द्या. त्यानंतर समीकरणे काय ठरतात हे ठरवू. भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे त्यात कोणतेही मतभेद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून आमची युती झाली का?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर आम्ही छोटा भाऊ होऊ की मोठा भाऊ हा प्रश्न नाही. चंद्रबाबू नायडू आमच्यासोबत आले म्हणून त्यांच्यासोबत आमची युती झाली का?. त्यांची प्रासंगिक काय युती आहे त्याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं

योजनेत कपात नाही

लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी घेतलेला निर्णय कायम राहील. त्यात आणखी काही बदल किंवा अपडेट करायचा असेल तर त्याचं स्वागत आहे. पण त्यांना आज जे काही मिळत आहे त्यात कपात होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.