Virat Kohli Retirement : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच तडकाफडकी निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे कोणताही जागावाजा न करता त्याने आपला हा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, या निर्णयानंतर विराटची जागा कोण भरून काढणार, याची चर्चा रंगली आहे. असे असताना आता एका दमदार मराठमोळ्या क्रिकेटरचे नाव समोर येत आहे.
आगामी 20 जून पासून भारत आणि इग्लंड यांच्यात कोसटी मालिका होणार आहे. असे असतानाच कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट संघात आता मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विराट कोहली हा मधल्या फळीत संघाला सावरणारा आघाडीचा फलंदाज आहे. पण तो नसल्याने आता मधल्या फळीत कोणाला घ्यायचे असा प्रश्न बीसीसीआयपुढे निर्माण झाला आहे.
मधल्या फळीत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत यासारखे दमदार फलंदाज आहेत. मात्र क्रिकेटचा मोठा अनुभव असणारा आणि इंग्लंडच्या गोलंदाजांच्या स्विंग आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करणाऱ्या खेळाडूची संघाला गरज आहे. त्यामुळेच आता मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य राहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.
इंग्लंडसोबतच्या कसोटी सामन्यांत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहाणे या दोन खेळाडूंची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. हे दोन्ही खेळाडू प्रादेशिक क्रिकेट स्पर्धांत तुफानी खेळ करताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांना भारतीय संघात पुन्हा संधी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दोन्ही खेळाडूंच्या सध्याच्या खेळाबद्दल बोलायचं झाल्यासस पुजाराने 2024-25 च्या रणजी ट्रॉफीत एकूण सात सामन्यांत 40.20 च्या सरासरीने 402 धावा केल्या आहेत. तर अजिंक्य राहाणेने 35.92 च्या सरासरीने एकूण 467 धावा केलेल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना 2023 साली खेळलेला आहे. त्यामुळे त्यांचा सध्याचा फॉर्म पाहता विराटच्या निवृत्तीनंतर दोघांपैकी एकाला संधी मिळणार का? असे विचारले जात आहे.
दरम्यान, विराटच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? याची उत्तरं अद्याप अनुत्तरीत आहेत. बीसीसीआयने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या खेळाडूला भारतीय संघात संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.