अंकुशनगर : शहागड (ता. अंबड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा बेसुमार वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवरच तस्करांनी ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जीव वाचविण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून चार राऊंड फायर केले. या गोळीबारनंतर वाळू तस्कर दोन ट्रॅक्टर सोडून पळून गेले. ही घटना रविवारी (ता. ११) सकाळी सातला घडली.
अंबड तहसीलदार महसूल कर्मचारी यांच्यासोबत गोदावरी नदीपात्रातून होणारी अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी रविवारी सकाळी सहापासून गस्तीवर असताना तहसीलदार विजय चव्हाण शहागड पुलाखाली गेले. त्यांचे महसूल पथक रमेश वालेकर व राजेश चव्हाण हे दुसऱ्या बाजूने शहागड उड्डाणपुलाखाली येत होते. त्या ठिकाणी १५ व्यक्ती ३ ट्रक्टरमध्ये अवैध वाळू भरत होते. तहसीलदार चव्हाण यांना पाहून काही जण पळून गेले.
चौघांवर गुन्हे, दोन ट्रॅक्टर जप्तहवेत गोळीबार होताच ट्रॅक्टर चालक इशान इम्रान खान व तीन अनोळखी व्यक्ती एक ट्रॅक्टर घेऊन पळाले. दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने जागीच पकडले. सदर ठिकाणावरून दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय, अंबड येथे लावण्यात आले. या कारवाईत दोन ट्रॅक्टर व ट्रॉलींसह ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून इशान इम्रान खान (रा. गेवराई, जि. बीड) व ३ अनोळखी व्यक्तींवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिव्हॉल्व्हरमधून चार राउंड फायरट्रॅक्टर (एमएच २० एफपी ७८३२) चालक इशान इम्रान खान (रा. तहसील कार्यालयाच्या बाजूला, गेवराई) पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास तहसीलदारांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तहसीलदार विजय चव्हाण बाजूला सरकले. त्यानंतर चार जण काठ्या घेऊन यांच्या अंगावर धावून आले. यावेळी स्वरक्षणात तहसीलदार यांनी आपल्या खासगी रिव्हॉल्व्हरमधून चार राउंड फायर केले.
शहागड गोदावरी पात्रात रविवारी सकाळी वाळू विरोधी कारवाईसाठी गेलो असता वाळू तस्करांनी माझ्या व खाजगी चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. लाठ्या काठ्या घेऊन मला घेराव घातला असता स्वरक्षणासाठी हवेत चार वेळा गोळीबार केला. सदर वाळू तस्कर गेवराई तालुक्यातील होते. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन ट्रॅक्टर पकडले असून त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
- विजय चव्हाण, तहसीलदार अंबड