Soldier Surgery: सीमेवर जाणाऱ्या जवानावर मोफत शस्त्रक्रिया, बार्शीच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी; जवान सीमेवर रुजू
esakal May 12, 2025 04:45 PM

बार्शी : साखरपुड्यासाठी पंधरा दिवसांसाठी जवान रजा काढून सुटीवर आला. ७ मे रोजी साखरपुडा झाला, पण कार्यक्रमानंतर पोटामध्ये दुखू लागले. शरीराची तपासणी केली असता किडनी स्टोन असल्याचे निदान झाले, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल सांगितले, पण सरकारने सीमेवर बोलावले होते अशा परिस्थितीत जवानावर तत्काळ शस्त्रक्रिया करून जवान देशसेवेसाठी कर्तव्यावर रुजू झाला. ही शस्त्रक्रिया मोफत करणाऱ्या डॉ. पुष्कराज यादव यांचे बार्शी शहरात कौतुक होत आहे.

रस्तापूर (ता. बार्शी) येथील जवान संदीप गलांडे भारतीय सैन्य दलामध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये टेक्नीशियन पदावर भरती झाले. अडीच वर्षांपासून सीमेवरील दुर्गम भागात कार्यरत आहेत. कुटुंबाने विवाह ठरवला आणि ३० एप्रिल रोजी सुटी काढून ते आले. ७ मे रोजी साखरपुड्याचा मुहूर्त ठरला पण ऑपरेशन सिंदूर सुरू झाले. शासनाने सुटी रद्द करून हजर राहण्याचे आदेश दिले.

कार्यक्रमानंतर जीवाची घालमेल होत होती, पोटात दुखत होते म्हणून जवान गलांडे यादव हॉस्पटलच्या डॉ. पुष्कराज यादव यांचेकडे तपासणीसाठी आले डॉक्टरांनी तपासणी केली असता किडनी स्टोन असल्याचे निष्पन्न झाले. पण गलांडे यांची शस्त्रक्रिया करण्याची तयारी नव्हती. देशात संकटाची परिस्थिती असताना परत येतो अशी भावना डॉक्टरांजवळ व्यक्त केली.

डॉ. यादव यांनी तत्काळ होल्मीयम लेझरद्वारे जवान गलांडे यांचेवर उपचार करून तंदूरुस्त केले. सीमेवर जाण्यासाठी परवानगी दिली. अत्यंत कमी वेळेत योग्य शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी महागडी शस्त्रक्रिया असताना जवानाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे डॉ.पुष्कराज यादव यांचे कौतुक होत आहे.

देशाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून सीमेवर लढणाऱ्या जवानावर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी देशसेवेचा वेगळा आनंद मिळाला. जवान गलांडे यांची शस्त्रक्रिया परत करू पहिले जाऊ द्या औषधे द्या, परत येईन ही देशसेवेची भावना होती, पण शस्त्रक्रिया तत्काळ करून कर्तव्यावर पाठवल्याचा अभिमान वाटला. ही सेवा आर्मीच्या जवानांसाठी दिल्ली, मुंबई, पुणे येथील रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात जवान कधी येत नाहीत.

- डॉ. पुष्कराज यादव.

ऑपरेशन सिंदूर सुरू झाले. रजा रद्द झाली. अचानक त्रास झाला. डॉ. पुष्कराज यादव यांच्याकडे तपासून सेवेत रुजू व्हावे म्हणून तपासणी केली. पण किडनी स्टोनमुळे डॉक्टरांनी तक्ताळ शस्त्रक्रिया करतो त्रास होणार नाही सांगितले. त्यांच्या मनात देश आणि जवानाबद्दल असलेली भावना दिसून आली. त्यांनी शस्त्रक्रियेचे बिलही घेतले नाही.

संदीप गलांडे, जवान, रस्तापूर (ता. बार्शी)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.