भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून सोमवारी (१२ मे) निवृत्ती जाहीर करत अचानक सर्वांना धक्का दिला. विराटची कामगिरी आणि वय पाहातो तो अजून दोन वर्षे सहज खेळू शकतो असं अनेकांना वाटत होतं. पण ३६ वर्षीय विराटने कसोटीत थांबण्याचा निर्णय घेतला.
भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात ५ सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसात भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. पण त्याआधीच विराटने निवृत्ती घेतल्याने सर्वांना धक्का बसला. त्याच्या निवृत्तीमागे काय कारण असावे अशी चर्चाही होत आहे.
त्याच्या निवृत्तीबद्दल क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. याचदरम्यान दिल्ली राज्य संघाच्या प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.त्यांनी म्हटल्या प्रमाणे विराटला इंग्लंड दौऱ्यात खेळायचे होते. त्याची इंग्लंडविरुद्ध ४-५ शतके करण्याचीही इच्छा होती.
सरनदीप यांनी सांगितले की जानेवारी २०२५ मध्ये जेव्हा दिल्लीकडून रेल्वेविरुद्ध रणजी सामना खेळण्यासाठी आला होता, त्यावेळी त्याच्याशी त्यांचे बोलणे झाले होते. त्यांनी सांगितले की त्यांना त्याच्या निवृत्तीने धक्का बसला. कारण तो इंग्लंड दौरा खेळणार असल्याचे त्यांना म्हणाला होता.
सरनदीप जिओस्टारशी बोलताना म्हणाले, 'आज सकाळी जेव्हा मी विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीची बातमी ऐकली, तेव्हा मला आश्चर्चाचा धक्का बसला. जेवढं मला माहित आहे की जेव्हा आम्ही दिल्ली रणजी ट्रॉफीबद्दल बोलत होतो. आम्ही ४-५ दिवस आधी त्याच्याशी त्याला पुढे खेळायच्या असलेल्या सामन्यांबद्दल बोलू लागलो होतो. त्यानेही त्यात सहभाग घेतलेला.'
'त्याने कसोटी क्रिकेटसाठी तयारी सुरू केली होती. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काय होऊ शकले असते, हे सांगत होता. पण त्याने इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी सुरू केली होती. तो तिथे सामने कसे जिंकू शकतो हा विचार करत होता. पण आता जो व्यक्ती इंग्लंडला जायची तयारी करत होता, तो तिथे जाणार नाही. या घोषणेने धक्का दिला आहे.'
सरनदीप यांनी सांगितले की ते विराटच्या संपर्कात होते, पण त्यांना तो अशी काही घोषणा करेल असं वाटतं नव्हतं. त्यांनी सांगितलं, 'मी त्याला काऊंटी क्रिकेट खेळू शकतो का, असं विचारलंही होतं. पण तो म्हणाला, नाही मला इंडिया ए साठी सामने खेळायचे आहेत. त्याने सांगितले की तो दोन इंडिया ए साठी सामने खेळेल, ज्यातून तो कसोटी सामन्यासाठी सराव करेल. त्याने सांगितले की त्याला ४-५ शतके इंग्लंड दौऱ्यात करायची आहेत, जशी २०१८ मध्ये केली होती.'
आता सरनदीप यांच्या या प्रतिक्रियेनंतर असे प्रश्न उपस्थित होत आहेत की विराटने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली असावी, बीसीसीआयकडून त्याला याबाबत काही सांगण्यात आले होते का?
अद्यापतरी त्याच्या निवृत्तीच्या कारणावर बीसीसीआय किंवा त्याच्याकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. विराटने १२३ कसोटी सामने खेळताना ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या आहेत.