टीम इंडियाला गेल्या काही दिवसांमध्ये 2 मोठे झटके लागले. कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या 2 दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला रामराम करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. दोघांनीही इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी संघाला अलविदा केला. विराट आणि रोहित या अनुभवी जोडीने याआधीच टी 20i फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता हे दिग्ग्ज एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. विराट आणि रोहित या दोघांचं आता वनडे वर्ल्ड कप 2027 हे लक्ष्य आहे. मात्र त्याआधी हे दोघे अनुभवी खेळाडू टीम इंडियासाठी केव्हा मैदानात उतरणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
रोहित शर्मा याच्याकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद आहे. तसेच टीम इंडियाची एकदिवसीय मालिकेला अद्याप बराच वेळ आहे. टीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर ब्लू आर्मीचा ऑगस्ट दौऱ्यात बांगलादेश दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहेत. मात्र या मालिकेवर टांगती तलवार आहे.
टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिका रद्द झाल्यास चाहत्यांना ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागू शकते. टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे.
विराटने टीम इंडियाचं 302 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.विराटने 290 डावांमध्ये 57.88 च्या सरासरीने 14 हजार 181 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 51 शतकं आणि 74 अर्धशतकं झळकावली आहेत. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला होता.
दरम्यान रोहित शर्मा याने टीम इंडियासाठी 273 एकदिवसीय सामन्यांमधील 265 डावांत 48.77 च्या सरासरीने 11 हजार 168 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान सर्वाधिक 3 द्विशतकं, 32 शतकं आणि 58 अर्धशतकं लगावली आहेत. दरम्यान सध्या विराट आणि रोहित दोघेही आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळत आहेत.