- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
सतत थकवा जाणवणं, दिवसभर ऊर्जा कमी वाटणं, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटायचं दूरच.... ही लक्षणं आज अनेकांना भेडसावत आहेत. अनेक वेळा सर्व तपासण्या नॉर्मल असल्या तरी शरीर ठीक वाटत नाही. मग नेमकं चुकतंय कुठे?
फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर यामागे एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे अॅड्रिनल फटिग.
अॅड्रिनल ग्रंथी म्हणजे दोन्ही मूत्रपिंडांच्या वर असलेल्या छोट्या ग्रंथी. त्या कोर्टिसोल नावाचं तणावविरोधी हार्मोन तयार करतात. तणाव आला, की कोर्टिसोल वाढतं आणि शरीर त्या परिस्थितीला सामोरं जातं; पण जेव्हा ताण सतत असतो – मानसिक, भावनिक, पोषणदृष्ट्या किंवा झोपेच्या अभावामुळे – तेव्हा अॅड्रिनल ग्रंथींवर ताण येतो. परिणामी कोर्टिसोलचं उत्पादन असंतुलित होतं आणि आपल्याला क्रॉनिक थकवा, सकाळी सुस्ती, साखरेची तल्लफ, झोपेचं बिघडलेलं चक्र, थोडंसं काम केल्यावर थकवा अशी लक्षणं जाणवतात.
कोर्टिसोल पातळी सातत्याने वाढलेली असेल, तर मेंदूची कार्यक्षमता कमी होते, थायरॉइडवर ताण येतो, आणि चयापचय क्रिया मंदावते – परिणामी वजन वाढू लागतं.
फंक्शनल मेडिसिनमध्ये केवळ लक्षणांवर नव्हे, तर मुळाशी जाऊन उपाय केले जातात. एनर्जी ड्रिंक्स किंवा साखरेऐवजी, जीवनशैलीमध्ये खोलवर बदल सुचवले जातात. त्यामध्ये या गोष्टींना महत्त्व दिलं जातं:
सात-आठ तासांची गुणवत्ता झोप
रक्तातील साखर संतुलित ठेवणारा आहार : प्रोटिन, हेल्दी फॅट्स आणि फायबर
तणावनियंत्रणासाठी ध्यान, प्राणायाम, नेचर वॉक्स
मूलभूत चाचण्या - व्हिटॅमिन D3, B12, थायरॉइड प्रोफाइल, जठर स्वास्थ्य
अॅड्रिनल फटिग ही ‘आजारी नाही; पण आरोग्यदृष्ट्या कमी पडणं’ अशी अवस्था आहे. अतिशय ताणाचा अंतिम टप्पा म्हणजे बर्नआउट, ज्याला सामान्यतः अॅड्रिनल फटिग म्हणतात. शरीर सतत थकलेलं वाटत असेल, तर त्याकडे ‘सहजच वाटतंय’ म्हणून दुर्लक्ष करू नका. योग्य मार्गदर्शन घेतल्यास शरीराला पुन्हा सशक्त बनवणं शक्य आहे - आणि हेच फंक्शनल मेडिसिनचं मुख्य तत्त्व आहे.