आयुष्य कोबीच्या भाजीसारखे बेचव झाले होते. पण युध्द सुरु झाले तेव्हा अचानक तात्यांना, आपल्या शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा भरपूर झाल्याप्रमाणे उत्साह आला. ८६ तास टीव्हीसमोर बसून तात्यांनी युद्ध खेळले. तहानभुकेची शुद्ध नव्हती. आंघोळीला तर वेळही नव्हता.
अर्थात ८६ तास एखाद्याने नाही केली आंघोळ तरी येवढे काही बिघडत नाही. पण अशा पारोश्या अवस्थेत सरहद्द ओलांडून गेलात तर ते पाकडे तोफा सोडून पळतील, असे टोमण्यांचे शेलिंग त्यांच्यावर मन:पूत करण्यात आले. पण तात्यांचा बचाव अभेद्य होता.
तथापि, युद्ध संपल्याची घोषणा अचानकच झाली आणि तात्यांचा साफ मूड गेला. छे, पाकड्यांना चेचायचा गोल्डन चान्स, ट्रम्पनं हातचा घालवला. अत्यंत आगाऊ मनुष्य आहे. दिसतोच कसा छटेल! खरं तर त्याचा फोनच घ्यायला नको होता. सरळ ब्लॉक करुन टाकायचा! म्हणे सीजफायर करा.
याच्या काय काकाचं जातं सांगायला? अजून आठवडाभरात पीओके आपल्याकडे, बलुचिस्तान स्वतंत्र, इस्लामाबादेत कमळ पोचलं असतं. ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना’!! या ट्रम्पनं परस्पर शस्त्रसंधी जाहीरसुध्दा करुन टाकली. हॅ:!!
तात्या हळहळले! पावसाळ्यात मच्छरदाणीत घुसलेले डास रॅकेटीनं फटाफट मारावेत, तसे हुडकून हुडकून पाकड्यांचे ड्रोन आपल्या एस-४०० डिफेन्स सिस्टिम ऊर्फ सुदर्शन चक्राने पाडलेन! हे एस-४०० काय प्रकर्ण आहे, हे तात्यांना अजून फारसे समजलेले नाही. पण त्याची गरजही नाही!
सीजफायर केलं नसतं तर आज इस्लामाबादेत पोचलो असतो. युद्ध सुरू झालं तेव्हाच तात्यांनी टीव्हीवरच्या बातम्या बघून बायकोला धाडकन विचारलं होतं: ‘‘पुढल्या मे महिन्यात आपण ॲबोटाबादच्या सुंदर पर्वतराजीतल्या एखाद्या रिसॉर्टवर सहलीला जाऊ. चालेल?’
गेला बाजार अखंड काश्मीरची एखादी चौदा दिवसांची ‘ग्रँड काश्मीर टूर’ विथ आपलं माणूस! तात्यांनी टीव्ही बघता बघता फ्रिज उघडून त्यातली दोन-तीन गाजरं काढून कराकरा खाऊन टाकली. टीव्हीवरची अँकरिका तारस्वरात ओरडून सांगत होती की, कराचीच्या बंदराच्या समोर आपली ‘विक्रांत’ उभी असून कराची बंदरावर संक्रांत आल्यासारखं वातावरण आहे.
बाराएक स्फोट आत्तापर्यत ऐकू आले असून, कराची बंदर उध्द्वस्त झालं आहे. दुसऱ्या टीव्ही वाहिनीची अँकरिका थेट लाहोरवर दणादण पाच-सात बाँम्ब टाकून आल्यामुळे तिथे दाणादाण उडालेली बघून तात्यांनी सोफ्यातल्या सोफ्यात कुदून युद्धात सहभाग घेतला.
तिसऱ्या टीव्ही वाहिनीवरला शूर अँकराधिपती गंभीर चेहऱ्यानं रावळपिंडी बेचिराख झाल्याचे वृत्त देत होता. त्याच्या मते पाकिस्तानने अगदीच विनाकारण न झेपणारा झुणका खाल्ला आहे. सबब, हे होणारच. पाकडे आत्ता लग्गेच शरण आले तर ठीक, नाहीतर हा देश काही आता नकाशावर राहणार नाही.
तिसऱ्या टीव्ही वाहिनीवरला युद्धकलेतील निपुण असा सरअँकर (सरसेनापती असतो, तसा सरअँकरही असतो. सरसूत्रधार असे अभिजात मराठीच्या समर्थकांनी फार्तर म्हणावे.) म्हणत होता की, ‘पाकिस्तान्यांनी चिनी विमानं आणि तुर्की ड्रोन वापरले. सगळे भारतीय लष्करानं पाडले. चिनी मालाला उठाव का नाही, हे आता प्रेक्षकांना कळलं असेल. चिनी वस्तू घेऊ नका. तुर्की वस्तूंवरही बहिष्कार घाला!’
तात्यांना पटले. चिनी वस्तूंचं ठीक आहे, पण तुर्की वस्तूंवर बहिष्कार घालायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे त्यांना कळेना. त्यांनी नाद सोडला.
...तेवढ्यात सीजफायरची बातमी आली. गेलेला मूड परत यावा म्हणून तात्यांनी बायकोला पोहे टाकायला सांगितले. ‘वर शेवसुध्दा घाल बरं का’ असं ते खोल आवाजात म्हणाले. ८६ तासांच्या युद्धप्रसंगामुळे ते अगदी दमून गेले होते.