Stock Market Today: ऑपरेशन सिंदूर नंतर बाजारात आलेली तेजी आज थांबली. बाजार घसरणीसह व्यवहार करू लागला. सेन्सेक्स 620 अंकांनी घसरून 81,809 वर उघडला. निफ्टी 60 अंकांनी घसरुन 24,864 वर उघडला. बँक निफ्टी 149 अंकांनी घसरून 55,233 वर उघडला.
डॉ. व्ही. के. विजयकुमार, चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, यांनी सांगितले, “काल झालेल्या युद्धविरामाच्या बातमीनंतर शेअर बाजारात जोरदार तेजी दिसली. पण आता थोडं थांबून, शांतपणे विचार करायला हवा की बाजाराची दिशा पुढे काय असेल.”
ते पुढे म्हणाले, “काल निफ्टीमध्ये तब्बल 916 पॉइंट्सची वाढ पाहायला मिळाली, पण ही वाढ संस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे (FII-DII) झाली नाही. काल संस्थांकडून केवळ 2,694 कोटींचीच खरेदी झाली. म्हणजेच ही तेजी प्रामुख्याने शॉर्ट कव्हरिंग, HNI (हाय नेटवर्थ व्यक्ती) आणि रिटेल गुंतवणूकदारांमुळे झाली. याचा अर्थ संस्थात्मक गुंतवणूक पुढच्या काही दिवसांत फारशी आक्रमक राहणार नाही, ज्यामुळे बाजारातली ही तेजी टिकून राहणं कठीण होऊ शकतं.”
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध शमवण्यासाठी दोन्ही देशांनी 90 दिवसांसाठी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जागतिक सकारात्मक संकेत आहे. अमेरिका आर्थिक मंदीत जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे, त्यामुळे तिकडच्या कंपन्यांकडून तंत्रज्ञान क्षेत्रात (IT) जास्त खर्च होण्याची शक्यता आहे — याचा फायदा भारतीय IT कंपन्यांना होऊ शकतो.
मात्र दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी औषधांच्या किमती कमी करण्याबाबत एक आदेश जारी केला आहे. त्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांना अमेरिकन बाजारात दर कमी करण्याचा दबाव आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या शेअरच्या किमतीवर होऊ शकतो.
मंगळवारी, शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये इटरनल शेअर (2%), इन्फोसिसचा शेअर (2%), टीसीएसचा शेअर (1.30%) आणि टाटा स्टीलचे शेअर (1.10%) घसरणीसह व्यवहार करत होते.
समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये, UPL शेअर (4%), पेटीएम शेअर (2.90%), फर्स्टक्राय शेअर (1.80%) घसरणीसह व्यवहार करत होते. स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये, जेन्सोल शेअर (4.99%), फिनटेक शेअर (4.90%) आणि एथर शेअर (4.56%) घसरणीसह व्यवहार करत होते.