वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. जेतेपद मिळवल्यानंतर रोहित आणि विराटने तात्काळ निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपद मिळवलं. पण या काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेची अंतिम फेरी काही भारताला गाठता आली नाही. त्यामुळे टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची तयारी सुरु झाली होती. असं असताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. त्यामुळे आता हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. असं असताना दोन्ही खेळाडू 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मत मांडलं आहे.
सुनील गावस्कर यांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलतांना सांगितलं की, ‘नाही.. मला वाटत नाही की दोघं वनडे वर्ल्डकप खेळतील. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला वाटत नाही हे दोन्ही खेळाडू तिथपर्यंत खेळतील. पण एक शक्यता अशी आहे की, जर दोन्ही खेळाडू पुढच्या वर्षी चांगल्या फॉर्मात दिसले आणि शतकी खेळी केली. तर त्याने देव देखील संघातून बाहेर काढू शकणार नाही.’ रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं की, ‘क्रिकेटच्या या फॉरमेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. 2027 च्या वनडे वर्ल्डकप संघात असेल असं आपल्याला वाटतं का? ते ज्या प्रकारच्या खेळासाठी ओळखले जातात ते दोघं देऊ शकतील का?’
कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी त्यांनी जसप्रीत बुमराहला पाठिंबा दिला आहे. जसप्रीत बुमराह हा कसोटी संघाचा कर्णधार असायला हवा असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं. जर दुसऱ्या कोणाची निवड केली तर बुमराहकडून अतिरिक्त गोलंदाजीची अपेक्षा वाढेल. कारण तो नंबर एक गोलंदाज आहे. त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. ‘जर बुमराह स्वत: कर्णधार असेल तर त्याला कधी ब्रेक घ्यायचा ते कळेल. तसेच त्याला नियोजन करता येईलय’, असा तर्क सुनील गावस्कर यांनी लावला आहे.