ऋणाली पाटील - रीसर्च असोसिएट आयआयएससी, बंगळूर
विज्ञान शाखा निवडून पदवी घेतल्यावर पुढे शास्त्रज्ञ किंवा संशोधक होण्याचा मार्ग मोजके विद्यार्थी निवडतात. एखाद्या विद्याशाखेतला आपल्या आवडीचा विषय आणि त्यातला सूक्ष्म घटक निवडून अतिशय खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करणं सर्वांना जमलेच असं नाही. त्यासाठी बराच वेळही द्यावा लागतो. अभ्यास, सातत्य, कष्ट करण्याची तयारी लागते.
संशोधक होण्याचा तुमचा प्रवास कसा झाला?
मी फार्मसीतून पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर दोन वर्षे मी औषधक्षेत्रातील कंपनीत काम केलं. त्यानंतर मला पीएच.डी. करायचं होतं. त्यासाठी मी विविध ठिकाणी प्रयत्न करत होते. दरम्यानच्या काळात आयआयटी मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील मोनॅश युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे एका अभ्यासक्रमाची आखणी केली होती व त्यात माझी निवड झाली. तिथे मला ॲनिमल स्टडीज, ‘सेल्स’वर काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून माझा प्रवास पुढे होत गेला.
संशोधक किंवा शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावं?
विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच विविध संधी शोधाव्यात. विविध विद्यापीठांची माहिती घ्यावी. इंटर्नशिपचे पर्याय शोधावेत. फेलोशिप्सला प्रस्ताव दाखल करावेत. पीएच.डी.चा अभ्यासक्रम कुठे कुठे होतो? याची माहिती आधीपासून घ्यावी. नेटवर्किंग वाढवावं. आंतरशाखीय अभ्यासक्रम करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे, त्याचाही विचार करावा. जसे की, मी फार्मसी केलेलं असलं, तरी मी केमेस्ट्रीमध्येही काम करते. यामुळे तुमचा ‘स्कोप’ वाढतो. आयआयटी, आयआयएससी, आयसर, एनसीएल-पुणे यांसारख्या संस्थां व त्यांच्याद्वाऱ्या चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची, अभ्यासक्रमांची माहिती घ्या.
संशोधकाकडे कोणती कौशल्ये असावीत?
संशोधनाचा विषय निवडण्यासाठी चिकित्सक बुद्धी हवी आणि त्यानंतर त्याचे विश्लेषण करता यावे. एकाच विषयावरील हजारो संशोधने, रीसर्च पेपर आपल्या समोर असतात. त्यामुळे एका टप्प्यावर असंही वाटू शकतं की, आता यात संशोधन करण्यासारखे काहीच शिल्लक नाही. मात्र, त्या घटकातील कोणत्या भागावर पुरेसे काम झालेले नाही? हे तुम्हाला शोधता यायला हवं. ते सापडलं की, त्यात सखोल अभ्यास करण्यासाठी आपोआप हुरूप येतो. आपण जे काम करतो आहोत, ते केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता, त्याचा लोकांच्या दैनंदिन जीवनात वापर व्हावा, त्यातू काही तरी चांगले घडावे हा ध्यास हवा. संयम, अभ्यास व कष्टाची तयारी, आर्थिक गणिते सांभाळण्याची तयारी, अपुऱ्या साधनांमध्ये काम पूर्ण करण्याची जिद्द हवी.
संशोधन करताना...
१ अपुऱ्या साधनांबद्दल तक्रार न करता त्यावर उपाय शोधून पुढे जात राहा.
निराश होऊ नका.
२ स्वयंशिस्त खूप महत्त्वाची आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
३ तुमच्या संशोधनाला चौकटीत न ठेवता त्याचा इतरांना उपयोग कसा होईल,
यासाठी प्रयत्न करा.
(शब्दांकन : मयूर भावे)