Kirana Hills, पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक विशेष ठिकाण आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर हा परिसर एकदम प्रकाशझोतात आला. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले. त्यामुळे पाकने हल्ले केले. ते हल्ले भारतीय एअर डिफेन्स सिस्टिम एस 400 ने हवेतच नष्ट केले. त्यानंतर भारतीय हवाई दलाने अवघ्या 3 तासात पाकिस्तानची संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली. तिथल्या लष्कराची नाचक्की केली. या हल्ल्यात पाकिस्तानातील 11 एअरबेस आणि हवाई दलाचे 20 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.
भारताने हल्ला केला तेव्हा पाकिस्तानातील किराणा हिल्स अचानक चर्चेत आले. पाक लष्करासह सरकारची एकच तारांबळ दिसून आली. भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले की, त्यांनी किराणा हिल्सवर हल्ला केला नाही. पण किराणा हिल्स पाकिस्तानसाठी जीव की प्राण का आहे, याविषयी प्रश्नांची मालिका सुरू झाली.
एरिया 51 का आहे खास?
किराणा हिल्स पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील सरगोधा जिल्ह्यातील ठिकाण आहे. हा परिसर अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित आहे. पाकिस्तानची अणु क्षमता आणि तिचा विकास आणि जतन याच भागात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही संरक्षण तज्ज्ञांच्या मते, 1980 च्या दशकात येथे भूमिगत बोगदे आणि बंकर बांधण्यात आले होते.
खरंच किरणोत्सर्ग झाला?
समाज माध्यमांवर पाकिस्तानच्या या लष्करी तळावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतीय मिसाईलने येथे हल्ले झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे येथे किरणोत्सर्ग (radiation leak) झाल्याच्या अफवा पसरल्या. भारतीय हवाई हल्ल्यांमुळे या भागातील अण्वस्त्र साठ्यांवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याला पाकिस्तान सरकार अथवा जागतिक संस्थांकडून दुजोरा मिळालेला नाही.
पण इजिप्तच्या वायुसेनेचे एक मालवाहू विमान पाकिस्तानमध्ये उतरल्याची पाकमध्येच जोरदार चर्चा आहे. या विमानाने किरणोत्सर्ग रोखण्यासाठी आवश्यक बोरॉन -10 हे रसायन आणण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. Boron-10 हे अण्वस्त्र दुर्घटनांमध्ये किरणोत्सर्ग नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येते.