चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. चिमूर तालुक्यातील करबडा येथे तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कचराबाई अरुण भरडे (वय ५४) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव असून तेंदूपत्ता गोळा करताना पतीसमोरच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला. घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव असून चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या ६ महिलांचा गेल्या ५ दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. तेव्हा वाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील शहरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या परिक्षेत्रात घडली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील सासू, सूनेचा मृत्यू झाला होता.
मृत महिलांची नावे कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (वय २८), रेखा शालिक शेंडे (वय ५०) अशी आहेत. या तिन्ही महिला मेंढा माल गावातील आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. तिन्ही महिलांच्या मृत्यूने चौधरी आणि शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.