Monsoon 2025 : अंदमानमध्ये नभ उतरू आलं! दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटांवर मॉन्सूनची वर्दी
esakal May 14, 2025 11:45 AM

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) मंगळवारी अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील प्रवास वेगाने होत मॉन्सून यंदा २७ मेपर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत आहेत.

निकोबार बेटांवर गेल्या चोवीस तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच पुढील दोन दिवस हा पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत. या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत २० नॉट्स वेगाने पश्चिमी वारे वाहत आहे. अंदमान समुद्रात काही ठिकाणी ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचे प्रवाह दिसून येत आहे. त्याचबरोबर आकाशात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, ढगांची दाटी आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत मॉन्सून धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.

यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे.

पाच दिवस आधीच आगमन

यंदा मॉन्सूनचे तब्बल पाच दिवस आधीच आगमन झाले आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी मॉन्सूनने धडक दिली होती. ६ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली होती.

आधीचे आगमन

वर्ष तारीख

  • २०२१ २१ मे

  • २०२२ १६ मे

  • २०२३ १९ मे

  • २०२४ १९ मे

  • २०२५ १३ मे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.