अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Gangster Gaja Marne’s Mutton Party Leads to Suspension of 5 Pune Cops : गुंड गजा मारणे याची मटण पार्टी पुणे पोलिसांना भोवली आहे. पुणे पोलिस दलातील १ अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सांगली कारागृहात घेऊन जाताना मारणे याने पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणे आणि बेजबाबदारपणे वागणुकीमुळे पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
या प्रकरणी सहायक निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आळे आहे. मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली तुरूंगात पाठवले होते, त्यावेळी ढाब्यावर मटण पार्टी झाली अन् पोलिसांना भोवली.
काही महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून त्याला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येणार होते. गजा मारणे याला सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे त्याला घेऊन पोलीस व्हॅन सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सांगलीच्या दिशेने निघाली मात्र थेट पोहोचण्यापूर्वी ती एका ‘ढाब्या’वर थांबली. साताऱ्यात असलेल्या ढाब्या वर व्हॅन थांबली, पोलिस कर्मचाऱ्यांनी जेवण केलं.
दुसऱ्या बाजूला, पोलीस व्हॅनच्या मागावर असलेल्या मारणे टोळीची गाडी सुद्धा त्याठिकाणी येऊन थांबली. मारणेच्या "पोरांनी" ढाब्या मधून एक मटण प्लेट आणली आणि थेट व्हॅन मध्ये बसलेल्या मारणे याला दिली. ही सगळी घटना ढाब्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पुणे पोलिस आयुक्त यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तपासणी करण्यासाठी सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यातून ही मटण पार्टी समोर आली.
मकोकातील आरोपी याला बाहेरचे खाणे खाऊ देणे यासोबतच आरोपीच्या सहकाऱ्यांना भेटू देणे तसेच वरिष्ठांना कुठली ही कल्पना न देणे सोबतच स्वतःची आणि इतरांची सुरक्षा धोक्यात घालणं याबरोबरच बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तवणूक असा ठपका ठेवत पोलिसा सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ही कारवाई केली आहे गजा मारणेला ढाब्यावर भेटलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ तसेच बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
गुंड गजा मारणे कोण आहे ?
गजानन उर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. कोथरूड परिसरात मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गजा मारणे ओळखला जातो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे यासह ३० गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे आणि जिल्ह्यात त्याची दहशत आहे. २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणी गजा मारणेवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली. यापूर्वीही त्याच्यावर पाच वेळा मोक्का लावण्यात आला आहे. २०२२ मध्ये २० कोटींच्या खंडणीप्रकरणी त्याला अटक झाली होती. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याने ३०० वाहनांसह मिरवणूक काढली होती, त्यामुळे त्याला पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता.