टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर रोहित शर्मा याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रोहितने मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली. यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते. रोहितने निवृत्तीनंतर फडणवीस यांची भेट घेतल्याने माजी कर्णधार लवकरच राजकारणात उतरणार आहे का? अशी चर्चा आता सोशल माीडियावर पाहायला मिळत आहे. रोहितच्या राजकारणातील पदार्पणाबाबतची फक्त चर्चा आहे, असं जरी असलं तरी अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे रोहितही तसंच करणार का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर आणि पुणेकर केदार जाधव याने मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीतल भाजप प्रवेश केला होता. तसेच टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे देखील भाजपचे लोकसभा खासदार राहिले आहेत. तसेच युसूफ पठाण, कीर्ती आझाद, नवज्योत सिंह सिधू, मोहम्मज अझहरुद्दीन यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे रोहितनेही तसा निर्णय घेतला तर चाहत्यांना आश्चर्य वाटेलच असं नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित शर्मासोबतच्या भेटीचे फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केले आहेत. “टीम इंडियाचा क्रिकेटर रोहित शर्मा याचं माझ्या शासकीय निवासस्थानी स्वागत. रोहितला भेटून आणि त्यासोबत बोलून मला आनंद झाला. मी रोहितचं कसोटी क्रिकेटमधील योगदानसाठी अभिनदंन केलं आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या”, असं फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
रोहितने आयपीएलच्या 18 व्या मोसमाची धामधुम असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहितने इंस्टा स्टोरीतून निवृत्त होत असल्याची माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली होती. रोहितने या पोस्टच्या माध्यमातून त्याला पाठींबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
रोहित शर्मा याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 1 द्विशतक, 12 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 40.57 च्या सरासरीने एकूण 4 हजार 301 धावा केल्या. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप उपविजेता राहिली. रोहितने टीम इंडियाची 24 टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन्सी केली. रोहितने त्यापैकी 12 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजयी केलं. तर 9 वेळा पराभूत व्हावं लागलं. तसेच 3 सामने हे अनिर्णित राहिले.